Buldana Live Exclusive :…म्‍हणून आपल्या बुलडाणा जिल्ह्यात आहेत अवघे एक लाख बैल!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिवसेंदिवस शेतकरी यांत्रिकीकरणाकडे झुकत आहेत. शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देताना दावणीला बांधलेल्या बैलांची संख्या सुद्धा घटू लागली आहे. छोट्यांपासून मोठ्या कास्तकारांपर्यंत सर्वांनीच गोठ्यातील जनावरांची संख्या कमी केली आहे. जिल्हा पशुसवर्धन कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये आता केवळ १ लाख १० हजार बैल उरले आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिवसेंदिवस शेतकरी यांत्रिकीकरणाकडे झुकत आहेत. शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देताना दावणीला बांधलेल्या बैलांची संख्या सुद्धा घटू लागली आहे. छोट्यांपासून मोठ्या कास्तकारांपर्यंत सर्वांनीच गोठ्यातील जनावरांची संख्या कमी केली आहे. जिल्हा पशुसवर्धन कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये आता केवळ १ लाख १० हजार बैल उरले आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी शेतकऱ्याकडील पाळीव प्राण्यांची गणना केली जाते. पशुगणनेनुसार जिल्ह्यात ५ लाख गाय व म्हैसवर्गीय जनावरे आहेत. पैकी १ लाख १० हजार बैल व गोऱ्हे (गायीचा बछडा) आहेत. कमी श्रमात जास्त काम करून घेणारे ट्रॅक्टर आल्याने हळूहळू बैलांची गरज संपत चालल्याचेच दिसून येत आहे.

पूर्वीच्या काळी ज्याच्याकडे अधिक बैलजोड्या तो गावातील श्रीमंत माणूस समजले जात होते. आता त्याऐवजी कुणाकडे कोणत्या कंपनीचे ट्रॅक्टर आहे हे बघितले जाते. यांत्रिकिरणाने शेतीची कामे झटपट होत असली तरी कामे करण्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागतात. डिझेलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टरने मशागतीचा खर्चही वाढला आहे. याउलट शेतीतील अनेक कामे अजूनही बैलांच्या माध्यमातून करून घेण्याकडे काही शेतकऱ्यांचा कल असतो. ट्रॅक्टरने केलेली पेरणी आणी बैलांनी तिफणीच्या आधारे केलेली पेरणी यात बरीच तफावत असल्याचे शेतकरी सांगतात.

कोळपणीच्या कामासाठी आजही बैलांनाच प्राधान्य दिले जाते. पूर्वी ज्या परिवाराकडे २०-२५ एकर शेती होती त्या कुटूंबामध्ये शेतीचे विभाजन झाल्याने ती २-३ एकरावर आली आहे. शेतीच कमी असल्याने बैलजोडी गोठ्यात ठेवणेही लहान शेतकऱ्यांना कठीण होऊ लागले. पूर्वीच्या काळी शेती जास्त असल्याने बरीच शेती पडीक राहत होती. ती जनावरांना चारण्यासाठी उपयोगात येत होती. मात्र आता चराईक्षेत्र कमी झाल्याने बैलांना चारायचे तरी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. बैल विकत घ्यायला कुणी तयार नसल्याने काहींनी कत्तलखान्यात बैल विकल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे बैलांची संख्या कमी होत आहे. पोळा या सणाच्या दिवशी मातीच्या बैलांचीच पूजा करण्याची वेळ अनेकांवर आली आहे.