BREAKING : एकनाथ शिंदे मेहकरात असतानाच रविकांत तुपकरांच्या एल्गार महामोर्चाचे बॅनर फाडले; काही बॅनर काढून नेल्याचाही आरोप!

 प्रतापराव जाधवांच्या कार्यकर्त्यांवर थेट आरोप; तुपकर-जाधव यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा पेटणार?

 
 मेहकर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर येथे आयोजित दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे मेहकरात आले असतानाच एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेचे आणि ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात होणाऱ्या दुष्काळ एल्गार महामोर्चाचे मेहकर शहरात आधीपासून लावण्यात आलेले काही बॅनर फाडण्यात आले असून, काही बॅनर काढून नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांनीच हे कृत्य केल्याचा थेट आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केला आहे. याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई, सरसकट कर्जमाफी, हक्काचा पीकविमा आणि शेतमालाला योग्य भाव यांसह विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी १४ नोव्हेंबरपासून दुष्काळ संघर्ष यात्रा सुरू केली आहे. जिल्हाभरात या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून, ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात होणाऱ्या दुष्काळ एल्गार महामोर्चाच्या जनजागृतीसाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मेहकर शहरातही हे बॅनर आधीपासून लावण्यात आले होते. मात्र, आज एकनाथ शिंदे यांच्या मेहकर दौऱ्याच्या दिवशीच हे बॅनर फाडण्यात आल्याने या प्रकाराला राजकीय वळण मिळाले आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

एकीकडे मेहकरात सत्ताधाऱ्यांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, तर दुसरीकडे त्याच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित एल्गार महामोर्चाचे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याच्या दिवशीच शेतकरी आंदोलनाच्या प्रचाराचे बॅनर नेमके कुणाच्या सांगण्यावरून हटविण्यात आले? यामागे राजकीय कारण आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे. या पार्श्वभूमीवर मेहकरातील आजच्या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रतापराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांवर डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केलेल्या थेट आरोपामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आरोपांवर प्रतापराव जाधव अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. पोलीस तपासातून नेमके काय निष्पन्न होते आणि रविकांत तुपकर या प्रकारावर काय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.