BREAKING उबाठा शिवसेनेत लेटर बॉम्ब! ३८ पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांची कंप्लेंट?  उद्धव ठाकरेंना भेटीची वेळ मागितली;

जिल्हाप्रमुख बुधवंत म्हणाले, कुणीतरी फुस लावली असेल...

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा उबाठा शिवसेनेत भूकंप होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर उबाठा शिवसेनेतील असंतोष उफाळून आला आला आहे. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांची तक्रार थेट उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्हा शिवसेनेतील प्रमुख ३८ पदाधिकाऱ्यांच्या नावाने एक पत्र उध्दव ठाकरेंना लिहिण्यात आले असून त्यात जिल्हाप्रमुख श्री बुधवंत यांच्यावर आरोप केले आहेत. शिवाय काही गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष भेटून सांगायच्या आहेत त्यामुळे भेटीची वेळ देण्यात यावी अशी विनंती उध्दव ठाकरेंना करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात उबाठा शिवसेनेच्या या कथित असंतुष्ट पदाधिकाऱ्यांची उध्दव ठाकरे यांच्यासोबत भेट होण्याची शक्यता आहे. दरम्यान बुधवंत यांच्या विरोधात ३८ पदाधिकाऱ्यांची नावे पत्रावर लिहिलेली असली तरी त्यावर किती लोकांनी सह्या केलेल्या आहेत हे मात्र समोर येऊ शकले नाही..
                     Advt👆
सूत्रांनी संबधित पत्राचा मसुदा "बुलडाणा लाइव्ह" पर्यंत पोहचवला आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्हाप्रमुख बुधवंत यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवला नाही. बुलडाणा विधानसभा मतदारसंघ सोडता इतर मतदारसंघात त्यांनी केवळ वरवर प्रचार केला. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात जिल्हाप्रमुख बुधवंत यांनी ब्र देखील काढला नाही. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव व बुधवंत यांचे व्यक्तिगत आर्थिक हितसंबंध आहेत. जालिंधर बुधवत पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सन्मान करत नाहीत. पदाधिकाऱ्यांना पद काढण्याची धमकी देतात. माझे कुणी वाकडे करू शकत नाही, मी मातोश्रीवर चांगला खुटा रोवला आहे असे सांगतात असे उध्दव ठाकरेंना लिहिलेला पत्रात नमूद आहे. बुधवंत यांनी जिल्ह्यात शिवसेना वाढवली नाही, केवळ कागदावर संघटन आहे असाही आरोप पत्रात केला आहे."आम्ही या गोष्टी लोकसभा निवडणुकीच्या आधीच आपल्याला कळवणार होतो मात्र दोघांच्या दहशतीमुळे कळवता आल्या नाहीत" असेही पत्रात नमूद आहे. त्याशिवाय अनेक गोष्टी प्रत्यक्ष भेटीत सांगायच्या आहेत, त्यामुळे भेटीची वेळ द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. या ३८ पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा शिवसेनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 
युवासेना जिल्हाप्रमुख नंदु कऱ्हाडे म्हणाले...
दरम्यान या कथित पत्रातील ३८ पैकी एक असलेले युवासेनेचे जिल्हाप्रमुख नंदु कऱ्हाडे यांच्याशी बुलडाणा लाइव्ह ने संपर्क केला असता, ते म्हणाले की, जालिंधर बुधवंत यांच्या विरोधातील कुठल्याही पत्रावर आपली सही नाही. त्यांच्याविरोधात आपली कोणतीही तक्रार नाही. सगळे सत्तेकडे जात असताना जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवण्यात श्री बुधवंत यांचा मोठा वाटा आहे. बुधवंत यांनी जिल्ह्यात शिवसेनेचे मजबूत संघटन उभे केले आहे, त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अरविंद सावंत यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला,त्यादिवशी कार्यक्रमाला उपस्थित म्हणून एका कागदावर आम्ही सह्या केल्या, त्या कागदाचा गैरवापर झाला असेल तर त्याची पक्षांतर्गत चौकशी करू असे ते म्हणाले. बुलडाणा तालुक्याचे माजी तालुकाप्रमुख डॉ.मधुसूदन सावळे यांचे देखील पत्रावर नाव आहे, मात्र आपल्याला अशा कोणत्या पत्राची कल्पना नाही. जालिंधर बुधवंत यांच्या विरोधात असण्याचा प्रश्नच नाही. कठीण काळात त्यांनी पक्ष जिवंत ठेवला, आपण जिल्हाप्रमुख बुधवंत यांच्यासोबत आहोत डॉ.मधुसूदन सावळे म्हणाले. आपण कोणत्या पत्रावर सही केली नाही असे ते म्हणाले. कपिल खेडेकर यांनीही आपण कोणत्या पत्रावर सही केली नसल्याचे म्हटले.
बुधवंत म्हणाले, आम्ही शिवसेना वाढीचेच काम केले;
 पत्र लिहीणाऱ्यांना कुणीतरी फुस लावली असेल...
दरम्यान यासंदर्भात "बुलडाणा लाइव्ह" ने जिल्हाप्रमुख श्री जालिंधर बुधवंत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की " कुणी तक्रार केली, कुणी उध्दव साहेबांशी पत्रव्यवहार केला याबद्दल आपल्याला माहिती नाही. शिवसेना या आमच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या तक्रारी असतील तर त्या मीडियात यायच्या आधी कुटुंबात बसून चर्चा होणे अपेक्षित असते. शिवसेना जिल्हाप्रमुख या नात्याने संघटनेच्या हिताचे जे असेल तीच कामे मी आतापर्यंत केली आहे. या तक्रारींना कुणीतरी विरोधी लोकांनी फुस लावली असेल, असा संशय आहे. पक्षात फूट फडली तेव्हा सगळी प्रलोभने, आमिषे असताना आम्ही शिवसेनेशी, उध्दव साहेबांशी एकनिष्ठ राहिलो. काही नवीन लोक संघटनेत आले आहेत, त्यांना शिवसेनेची काम करण्याची पद्धत माहिती नाही, त्यांना हाताशी धरून कुणीतरी काहीतरी करीत असेल. मात्र जिल्हा शिवसेनेत कुठेही नाराजी नाही, आम्ही सगळे एकदिलाने उध्दव ठाकरेंसोबत आहेत, शिवसेना वाढीसाठी कटिबद्ध आहोत असे श्री. जालिंधर बुधवत म्हणाले.