BREAKING : कर्जमुक्तीसाठी शेतकरी आंदोलन आक्रमक! जळगाव जामोदमध्ये तहसील कार्यालयावर चढून आंदोलन; उदयनगरात पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी...

 
 बुलढाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये शेतकरी आक्रमक पवित्रा घेत असल्याचे चित्र दिसत आहे. किनगाव जट्टू येथील एसटी बस जळाल्याची घटना, खामगावातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न आणि पेठ येथील पुलावर टायर जाळून करण्यात आलेल्या निदर्शनांनंतर आता जळगाव जामोद आणि चिखली तालुक्यातही आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. आज १७ जूनला जळगाव जामोद येथे रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून जोरदार आंदोलन केले. अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी "सरसकट कर्जमुक्ती करा" अशा आशयाचे फलक हातात घेत शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे.

उदयनगर येथे आंदोलन

दुसरीकडे चिखली तालुक्यातील उदयनगर येथेही शेतकरी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. गेल्या अर्ध्या तासापासून आंदोलक टाकीवर ठिय्या देऊन बसले असून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला समर्थन देत जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. १५ जूनपासून बुलढाण्यातील त्यांच्या निवासस्थानासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. विविध भागांत आंदोलनाची तीव्रता वाढत असताना काही ठिकाणी हिंसक घटनाही घडत आहेत. किनगाव जट्टू येथे एसटी बस पेटल्याची घटना, खामगाव येथे मध्यरात्री एसडीओ कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न आणि पेठ पुलावर टायर जाळून केलेले आंदोलन यामुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.

रविकांत तुपकर यांनी मात्र आंदोलक शेतकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. "शेतकऱ्यांचा लढा लोकशाही मार्गाने आणि शांततेत सुरू राहावा, कायदा हातात घेऊ नये," असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र शासनाकडून अद्याप ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना अधिक तीव्र होत असल्याचे चित्र राज्यभर दिसून येत आहे.