जळगाव जामोद मध्ये बोगस बियाणे आणि काळ्या बाजाराचा सुळसुळाट? शेतकरी प्रश्नावर उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक! तालुक्यातील कृषी केंद्रांच्या मनमानी विरोधात निवेदन... कारवाई न झाल्यास आंदोलन होणार..

 
 जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुका व शहर परिसरात काही कृषी केंद्रांमध्ये बियाणे आणि खतांच्या विक्रीमध्ये अनियमित्ता होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून होत आहे. या प्रश्नावरच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

तालुका व शहर परिसरातील कृषी केंद्रांमध्ये दरफलक व साठा नाही, जादा दराने खत विक्री होत आहे तसेच शेतकऱ्यांना पसंती ऐवजी अन्य खते घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पेरणीचा हंगाम जवळ आलेला असताना महाडीबीटी अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत पूर्व सूचना मिळत नसल्याने संभ्रम निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी शिवसेनेचे दत्ता पाटील, तुकाराम काळपांडे, शुभम पाटील,संकेत रहाटे, संतोष डब्बे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची कृषी केंद्र चालकांकडून पिळवणूक होत आहे. शेतकऱ्यांना जास्त दराने खत विक्री केल्यास, तसेच बोगस बियाण्यांच्या तक्रारी होऊ नये जर कृषी विभागाने कारवाई केली नाही तरी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.