भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या आज बुलढाण्यात; एकाच महिन्यात दुसरा दौरा; मतदार याद्या संदर्भात घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट..
भाजपचे लक्ष २०२९ की सोमय्यांच्या निशाण्यावर दुसरंच कुणीतरी? विजयराज शिंदे म्हणाले, सगळंच सांगत नसतात..
Apr 29, 2026, 10:10 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या आज,२९ एप्रिलला बुलढाण्यात येत आहेत. विशेष म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातल्या सारोळा मारोती गावात ते एका शुभकार्यात भेट देणार आहेत, त्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. भाजपच्या संघटनात्मक रचनेत किरीट सोमय्या यांच्याकडे महाराष्ट्र एसआयआर प्रमुख म्हणून जबाबदारी असल्याने मतदार याद्यांच्या घोळासंदर्भातच सोमय्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून कळते. गेल्या ३० दिवसाच्या आत सोमय्या दुसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहेत.अगदी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे भाजपचे लक्ष मिशन २०२९ आहे की त्यांच्या निशाण्यावर दुसरंच कुणीतरी आहे? याबाबत चर्चा होणे स्वाभाविक आहे..कारण किरीट सोमय्या यांचा स्वभाव अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे.. गत काळात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते.
भाजपचे अनेक वरिष्ठ नेते २०२९ ची विधानसभा स्वबळावर अशी विधाने अधून मधुन करत असतात. त्या दृष्टीने भाजपची तयारी देखील तशी सुरू आहे, मतदार याद्यांच्या शुद्धीकरणावर भाजपने विशेष लक्ष देत आहे. या अभियानाची जबाबदारीच अभ्यासू आणि तेवढेच फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे मतदार संघ सध्या भाजपच्या ताब्यात नाहीत अशा काही विशेष मतदारसंघांची यादीच तयार करून त्यावर विशेष फोकस देण्यात येत आहे. सोमय्या यांचा बुलढाणा दौरा त्या रणनीतीचाच भाग तर नाही ना? असा सवालही राजकीय विश्लेषकांना पडणे स्वाभाविक आहे.
रडारवर कोण?
सोमय्यांच्या बाबतीत एक गोष्ट विशेष बोलल्या जाते ती म्हणजे सोमय्या उगीच कुठे जात नाहीत. एकतर कुणीतरी त्यांच्या रडारवर असते किंवा पुढच्या काळात तिथले कुणीतरी रडारवर येत असते. बेहिशेबी संपत्ती, मालमत्ता याबाबत त्यांच्या रडारवर आलेला कुणी सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे बुलढाण्यात असे कोण आहे? जे सोमय्यांच्या रडारवर आहे,ते येणाऱ्या काळात समोर येईल. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी अधिक बोलणे टाळत सगळ्याच गोष्टी जाहीर करायच्या नसतात असे सांगत या दौऱ्याची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.