मोताळ्यात भाजप-काँग्रेससह राष्ट्रवादी, मनसेला धक्का! बजरंगपूरमध्ये असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; आ.संजय गायकवाडांच्या नेतृत्वावर विश्वास, मोताळ्यात ‘शिवसेना ताकद’ आणखी वाढली!
बुलढाणा येथील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत नव्या सहकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत केले.
पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या जनसंपर्काची पद्धत, सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद आणि विकासाभिमुख कार्यपद्धती यामुळे प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले.संजुभाऊ गायकवाड यांनी मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्या नेतृत्वाभोवती कार्यकर्त्यांची मोट बांधली जात असल्याचे या पक्षप्रवेशातून दिसून आले.
एकाच ठिकाणी अनेक पक्षांचे पदाधिकारी; राजकीय चर्चेला उधाण
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे यांसह इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने मोताळा तालुक्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चेला उधाण आले आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात शिवसेनेची गावपातळीवरील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये योगेश रायपुरे, दिनेश राऊत, विनायक बावस्कर, भानुदास गायकवाड, विकास बर्डे, संदीप राऊत, मारुती भुसारी, मोहन मराठे, प्रवीण ठाकरे, लक्ष्मण बर्डे, प्रमोद गायकवाड, संदीप कोळसे, गौरव राऊत, संतोष घाटे, रामदास पडोळकर, महादेव भुसे, विशाल चव्हाण, गणेश गणगे, सुनील बर्डे, महेंद्र सोंडे, गोपाल ठाकरे आणि परमेश्वर बर्डे यांच्यासह असंख्य नागरिकांचा समावेश होता.
संजुभाऊंच्या नेतृत्वाची चर्चा; मोताळ्यात स्थानिक निवडणुकीआधी शिवसेनेची ‘फिल्डिंग’ मजबूत?
आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच बजरंगपूर येथील विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा सामूहिक पक्षप्रवेश हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. गावागावात संपर्क, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि विकासकामांचा पाठपुरावा या माध्यमातून संजुभाऊ गायकवाड यांनी मतदारसंघात स्वतःची राजकीय पकड मजबूत केली असल्याचे या पक्षप्रवेशातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे..
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, दादाराव जाधव, अजय पारस्कर, नगरसेवक गोटू शर्मा, गजानन मामलकर, मनाभाऊ खोंदले, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बजरंगपूरमधील या सामूहिक पक्षप्रवेशामुळे मोताळा तालुक्यात शिवसेनेला नवी राजकीय ऊर्जा मिळाल्याचे चित्र असून, आगामी स्थानिक राजकारणात याचे पडसाद कितपत उमटतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.