डॉक्टर खंडणी प्रकरणात मोठी अपडेट! आता पोलीस वसुल करणार....

 

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील नामवंत हृदयरोगतज्ञ डॉ. सौरभ संचेती यांच्याकडून साडेआठ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ८ पैकी ५ आरोपींना पोलिसांना आतापर्यंत अटक केली असून ३ आरोपी पसार आहेत. आज ५ आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

डॉ.संचेती यांचा नग्न व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी तरुणांनी १३ ऑक्टोबरला साडेआठ लाख रुपये उकळले होते. त्यानंतर १८ ऑक्टोबरला दीक्षांत नवघरे या आरोपीने डॉक्टरांच्या हॉस्पिटलला येत पुन्हा पैशांची मागणी केली होती. आरोपी तरुणांचा हा त्रास यापुढेही असाच सुरू राहील म्हणून डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात काल,१९ ऑक्टोबरला तक्रार दिली होती. रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, आज ,२० ऑक्टोबरच्या पहाटे ३ पर्यंत याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली. दरम्यान आज पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार व रोख रक्कम वसुल करायची असल्याची बाजू पोलिसांकडून मांडण्यात आली. न्यायालयाने पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे..!

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान..!

दरम्यान सदर प्रकरणात पोलिसांसमोर आरोपी तरुणांनी डॉक्टरांकडून उकळलेली साडेआठ लाख रुपयांची रक्कम वसुल करण्याचे आव्हान आहे. याशिवाय तरुणांनी आपल्याला मारहाण करतांना कोयत्यासारखे शस्त्र वापरल्याचे डॉक्टरांनी तक्रारीत म्हटले होते, ते शस्त्र देखील पोलिसांना जप्त करायचे आहे.