BREAKING लाडकी बहीण योजने संदर्भात मोठे अपडेट..! एका कुटुंबातील दोघींना मिळणार लाभ; अविवाहित तरुणींनाही मिळणार फायदा! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यभरात लोकप्रिय ठरत आहे. एक जुलैपासून यासंदर्भातील अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याची मुदत आणखी पंधरा दिवसांनी वाढवल्याने आता ३१ जुलै पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. दरम्यान या योजना संदर्भातील महत्त्वाची अपडेट माहिती समोर आली असून योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एका कुटुंबातील केवळ दोघींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील माहिती आज, ३ जुलै रोजी सभागृहात दिली. एका कुटुंबातील दोघींनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या योजनेचा दुरुपयोग होऊ नये, आम्ही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून चूक केली का? असे कुणाला वाटू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ना.फडणवीस म्हणाले. शिवाय आधी केवळ विवाहित महिलांसाठी ही योजना होती मात्र आता त्यात सुधारणा करून कुटुंबातील अविवाहित तरुणीला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.