मोठी अपडेट! मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाचे(एसआयआर) सुधारित वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्टला प्रारूप, १९ ऑक्टोबरला अंतिम यादी...

 
 बुलढाणा (जिमाका / बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घराघरात जाऊन मतदार पडताळणी आणि गृहभेटीची मोहीम राबविणार आहेत. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनेचे कामही पूर्ण करण्यात येणार आहे.यानंतर १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर नागरिकांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. तसेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नोटिसा देणे, सुनावणी घेणे आणि प्राप्त दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मतदार यादी महत्त्वाची ठरणार असल्याने पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, तसेच आवश्यक असल्यास निर्धारित कालावधीत गणना प्रपत्र भरून निवडणूक प्रशासनाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.