BIG NEWS देऊळगाव राजात भरदिवसा थरार! 'आम्ही एलसीबी पोलीस आहोत' म्हणत ३२ वर्षीय युवकाला जबरदस्तीने इनोव्हात कोंबले अन् घेऊन गेले!

 प्लॉट खरेदीसाठी आलेल्या युवकाचे अपहरण झाल्याचा संशय; चार ते पाच जणांच्या टोळीमुळे शहरात खळबळ! सीसीटीव्हीत कार कैद...

 
 देऊळगाव राजा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्लॉट खरेदीच्या व्यवहारासाठी शहरात आलेल्या ३२ वर्षीय युवकाला भरदिवसा चार ते पाच जणांनी जबरदस्तीने इनोव्हा कारमध्ये बसवून नेल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तींनी आपण स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस असल्याची बतावणी केल्याची माहिती समोर येत आहे. शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयासमोरच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली असून, नेमके पोलीस असल्याची बतावणी करणारे हे लोक कोण? युवकाला कुठे नेण्यात आले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनिरुद्ध शिंगणे (वय ३२ वर्षे, रा. देऊळगाव मही) असे संबंधित युवकाचे नाव आहे. अनिरुद्ध हे प्लॉट खरेदीच्या व्यवहारासाठी देऊळगाव राजा येथे आले होते. शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर ते उभे असतानाच सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार त्यांच्याजवळ आली. या कारमध्ये चार ते पाच जण असल्याचे सांगण्यात येत आहे.

कारमधून उतरलेल्या व्यक्तींनी आपण एलसीबी पोलीस असल्याचे सांगत अनिरुद्ध यांना चौकशीसाठी सोबत येण्यास सांगितल्याची माहिती आहे. मात्र, त्यानंतर संबंधितांनी अनिरुद्ध यांना जबरदस्तीने कारमध्ये ओढून बसवले आणि तेथून निघून गेले. हा संपूर्ण प्रकार भरदिवसा घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

एलसीबीच्या नावाखाली अपहरण? नेमके काय घडले?

या घटनेतील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे युवकाला घेऊन जाणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची ओळख एलसीबी पोलीस अशी करून दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे खरोखरच पोलीस कर्मचारी होते की पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून युवकाचे अपहरण करण्यात आले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. या प्रश्नाचे उत्तर पोलीस तपासातूनच समोर येणार आहे.दरम्यान, युवकाला घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आलेली सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार शहरातील काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या वाहनाचा माग काढणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

नातेवाईकांची पोलीस ठाण्यात धाव; युवकाचा शोध सुरू!

अनिरुद्ध शिंगणे यांना अशाप्रकारे जबरदस्तीने घेऊन गेल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, देऊळगाव राजा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती आहे.दरम्यान, अनिरुद्ध यांना नेमके कुठे नेण्यात आले, त्यांना घेऊन जाणाऱ्यांचा उद्देश काय होता आणि या प्रकारामागे काही पूर्ववैमनस्य किंवा आर्थिक व्यवहाराचे कारण आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सर्व बाबींची तपासातून उकल होणे आवश्यक आहे.