BIG NEWS रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस उजाडला! तब्येत प्रचंड खालावली; राज्यभरात ठिकठिकाणी संतप्त शेतकऱ्यांकडून आक्रमक आंदोलने! अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळले;

 फत्तेपुरात जाळली महाराष्ट्र शासनाची टाटा सुमो; मेहकर आणि हिवरा आश्रम येथे तलाठी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न..
 
 बुलडाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज १८ जूनला चौथा दिवस उजाडला आहे. संपूर्ण कर्जमुक्ती,पीकविमा आदी मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून त्यांनी अन्नाचा कण देखील घेतलेला नाही,त्यामुळे त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा खूप कमी झाल्याने अशक्तपणा, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे आदी लक्षणे आहेत. पुढील काही तास अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले तर "हायपोग्लासोमिया" होऊ शकतो असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे.दरम्यान तुपकर यांची प्रकृती खालावत चालल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक होत आहेत. वाशिममध्ये अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून संतप्त शेतकऱ्यांनी निदर्शने केली. दुसरीकडे जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे शेतकरी आंदोलकांनी महाराष्ट्र शासनाची टाटा सुमो गाडी पेटवून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. वाशिम मध्ये महावितरणच्या कार्यालयासमोर देखील आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मेहकर आणि हिवरा आश्रम येथे तलाठी कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न अज्ञात आंदोलकांकडून करण्यात आला, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 शेतकरी नेते रविकांत तुपकर बुलढाणा येथील निवासस्थानी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. ठिकठिकाणी आक्रमक शेतकरी आंदोलकांकडून वेगवेगळी आंदोलने केली जात आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या रात्री मेहकर आणि हिवरा आश्रम येथे तलाठी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाशिम येथे अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे महाराष्ट्र शासनाची टाटा सुमो गाडी पेटवून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. शासनाने अद्याप पर्यंत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होत आहे..