BIG NEWS : पोलिसांना वाटलं कलेक्टर ऑफिसला जाणार; पण आमदार संजय गायकवाड समर्थकांची फौज थेट एसपी कार्यालयावर धडकली! ‘गुन्हे खोटे’ असल्याचा दावा, गुन्हे मागे घेण्याची मागणी

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘बापासाठी शरीर कुठून आणणार?’ या विधानावरून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. शहर पोलीस ठाण्यावर घेराव आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी हालचाली गतिमान केल्या होत्या.

पोलिसांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज बुलडाणा शहरात रूट मार्च होणार होता. मात्र आमदार गायकवाड समर्थकांच्या संभाव्य घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च तात्पुरता स्थगित करण्यात आला. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांनी घाईघाईने आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयाकडे पायीच धाव घेतली.

मातोश्री कार्यालयात पोहोचल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. या चर्चेनंतर घेराव आंदोलन स्थगित करून केवळ निवेदन देण्यात येईल, अशी भूमिका आमदार गायकवाड यांनी पोलिसांसमोर मांडल्याची माहिती आहे.

मात्र त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे पोलिसांची पुन्हा धावपळ उडाली.

आमदार गायकवाड पत्रकारांशी संवाद साधत असतानाच त्यांच्या समर्थकांची मोठी फौज निवेदन देण्यासाठी मातोश्री कार्यालयातून बाहेर पडली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आल्याने पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला. दरम्यान, समर्थक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जातील, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र समर्थकांनी अचानक आपला मोर्चा बदलत थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दिशेने कूच केले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

अखेर आमदार संजय गायकवाड समर्थकांची फौज पोलीस अधीक्षक कार्यालयावर पोहोचली. पोलिसांनी खबरदारी म्हणून आंदोलकांना कार्यालयाच्या गेटवरच रोखले. त्यानंतर निवडक शिष्टमंडळाला आत जाऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन निवेदन देण्याची परवानगी देण्यात आली.

या निवेदनातून आमदार संजय गायकवाड यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे व राजकीय हेतूने दाखल करण्यात आल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात आला असून, संबंधित गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण घडामोड घडत असल्याने बुलडाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.