BIG NEWS हाहाकार! जळगाव जामोदच्या मडाखेडमध्ये घरांत पाणी घुसले; २०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले! जळगाव जामोद तालुक्यातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी;
साधारणतः ६५ मिमी पाऊस झाला की अतिवृष्टी मानली जाते. मात्र जळगाव जामोद तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये एका रात्रीतच २५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच अतिवृष्टीच्या चौपट पाऊस एका रात्रीत कोसळल्याने परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज यावरून येतो.
मडाखेड गावात पुराच्या पाण्याने अनेक घरांमध्ये प्रवेश केला असून नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले आहेत. घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. गावात भीतीचे वातावरण असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.पूराच्या पाण्यामुळे जळगाव जामोद–संग्रामपूर मार्गावरील नदीला आलेल्या पुरामुळे रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील संपर्क तात्पुरता तुटला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक लहान-मोठे रस्तेही बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे सकाळपासून जळगाव जामोद तालुक्याच्या दौऱ्यावर असून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेत आहेत. बचाव आणि मदतकार्याला गती देण्यासाठी एनडीआरएफच्या दोन पथकांसह महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आणि इतर सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत करण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने नदी-नाल्यांच्या परिसरात न जाण्याचे, पूरग्रस्त भागापासून दूर राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेता प्रशासनाने सतर्कता वाढवली असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.