BIG NEWS पेनटाकळीच्या पाणीप्रश्नावर आमदार श्वेता महालेंची यशस्वी मध्यस्थी! शेतकऱ्यांसाठी सर्व कामे बाजूला ठेवून मैदानात उतरल्या; जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक,

 दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यावर एकमत!महालेंच्या हस्ते लिंबूपाणी घेत उपोषणाची सांगता; आज सायंकाळी पालकमंत्र्यांच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय...

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पेनटाकळी धरणातील पाणीवाटपाच्या प्रश्नावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी भाजपच्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी घेतलेल्या पुढाकाराला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, त्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळावे आणि धरणाच्या वरच्या व खालच्या बाजूच्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, यासाठी आमदार महाले यांनी आपली इतर कामे बाजूला ठेवून प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा केला. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पाणीवाटपाचे न्याय्य नियोजन करण्याबाबत एकमत झाले. प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आमदार महाले यांच्या हस्ते लिंबूपाणी घेत शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, पाणीवाटपाचा अंतिम निर्णय पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर उद्या घेतला जाणार आहे.

पेनटाकळी धरणातील पाणीवाटपावरून गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. विशेषतः धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकांना पाणी मिळावे, या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर पाण्याअभावी उभी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार श्वेता महाले यांनी पुढाकार घेतला.

प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक!

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, मेहकरचे माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह शेतकरी आणि शेतकरी प्रतिनिधी विनायक सरनाईक या बैठकीला उपस्थित होते.बैठकीत धरणाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजा, उपलब्ध पाणीसाठा आणि पिण्याच्या पाण्याची आवश्यकता यावर सविस्तर चर्चा झाली. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीवहनादरम्यान होणारी संभाव्य घट, सिंचनासाठी लागणारे पाणी आणि धरणाची सद्यस्थिती अशा विविध तांत्रिक बाबींचा विचार करून नियोजन करण्याबाबत एकमत झाले.

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ देऊ नका; महालेंची आग्रही भूमिका!

या बैठकीत आमदार श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणाचा मुद्दा प्राधान्याने मांडला. धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी जळू नयेत, त्यांच्या वर्षभराच्या कष्टांवर पाणी फिरू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची आग्रही भूमिका त्यांनी घेतली.शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन दिले. मात्र, उपलब्ध जलसाठा आणि दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेणे आवश्यक असल्याने पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरच पाणीवाटपाचे अंतिम नियोजन निश्चित होणार आहे.

उपोषणकर्त्यांशी थेट संवाद; महालेंच्या शब्दावर शेतकऱ्यांचा विश्वास!

बैठकीनंतर आमदार श्वेता महाले यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. हा प्रश्न केवळ पाण्याचा नसून शेतकऱ्यांच्या कष्टाचा, त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि उभ्या पिकांच्या अस्तित्वाचा असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

कोणताही घाईघाईचा निर्णय न घेता सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या संवादानंतर आणि प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली.अखेर आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन शेतकऱ्यांनी उपोषणाची सांगता केली. त्यामुळे पाणीप्रश्नावरून निर्माण झालेला तणाव निवळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

उपोषण संपले, पण पाण्यासाठीचा पाठपुरावा सुरूच!

शेतकऱ्यांचे उपोषण संपुष्टात आले असले, तरी पेनटाकळी धरणातील पाणीवाटपाचा अंतिम प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. पालकमंत्र्यांसोबत आज सायंकाळी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे आता प्रशासन नेमके कोणते पाणीवाटपाचे नियोजन निश्चित करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.