BIG NEWS जिल्हा बँक निवडणुकीत पहिल्याच फेरीत ‘एक त्यांचा, एक यांचा’!; सुनील उदयकार विजयी, शिवा तायडेंनीही मारली बाजी

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज, २४ ऑगस्ट रोजी बुलढाण्यातील सहकार विद्यालयात सुरुवात झाली असून, सुरुवातीलाच दोन निकाल हाती आले आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच निकालांमध्ये ‘एक त्यांचा... एक यांचा!’ असे चित्र पाहायला मिळाले आहे.

बुलढाणा मतदारसंघातून सहकार पॅनलचे सुनील उदयकार विजयी झाले आहेत, तर मलकापूर मतदारसंघातून स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलचे शिवा तायडे यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे मतमोजणीच्या सुरुवातीलाच सहकार आणि शेतकरी परिवर्तन पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांपैकी तब्बल १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ९ जागांसाठी २३ ऑगस्ट रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत सहकार पॅनल आणि स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली. एकूण १,८५७ पात्र मतदारांपैकी १,७५१ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ९४.३ टक्के होती.

आता आजच्या मतमोजणीत सुनील उदयकार आणि शिवा तायडे यांच्या विजयाने निकालाची रंगत वाढली आहे. उर्वरित मतदारसंघांतील मतमोजणीकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत कोणता पॅनल वरचढ ठरणार आणि जिल्हा बँकेच्या सत्तेच्या समीकरणात कोणाचे पारडे जड होणार, याचा फैसला उर्वरित निकालांनंतर स्पष्ट होणार आहे. मतमोजणी जसजशी पुढे सरकेल, तसतसे आणखी निकाल हाती येण्याची शक्यता आहे.