BIG NEWS बुलढाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा! मोर्चासाठी लावलेल्या खुर्च्या, मंडप आमदारांच्या माणसांनी काढून नेला! मंडपवाला म्हणतो, आम्हाला गावात रहाव लागतं!
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणखी काय म्हणाले? वाचा...
Apr 28, 2026, 11:24 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाच्या शीर्षकावरून निर्माण झालेला वाद काही थांबवायला तयार नाही. आमदार गायकवाड यांनी प्रकाशकाला शिव्या दिल्याचा कॉल व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते. आज बुलढाण्यात "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाचे जाहीर वाचन, आमदार गायकवाड यांच्या विरोधात मोर्चा असा एकंदरीत कार्यक्रम ठरला होता. मात्र आत्ता हाती आलेल्या माहितीनुसार रोहित पवार मोर्चात सहभागी होणार नाहीत. दुसरीकडे मोर्चाचे आयोजन करणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मात्र मोर्चा होईलच अशी भूमिका घेतली आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानाजवळ खुर्च्या आणि मंडप टाकण्याची व्यवस्था सुरू होती. मात्र मोर्चा सुरू व्हायला काही अवधी बाकी असतानाच इथल्या खुर्च्या आणि मंडप गायब झाला आहे. आमदारांच्या माणसांनी खुर्च्या आणि मंडप काढून दिल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चाच्या तयारीसाठी खुर्च्या आणि मंडप लावण्याचे काम सुरू होते. बुलढाण्यातल्याच एका स्थानिक बिछायत वाल्याला हे काम देण्यात आले होते. मात्र काम सुरू असतांना अचानक मंडपाचे पाईप आणि खुर्च्या काढून घेण्यात आल्या. याबाबत बिछायत वाल्याला विचारणा केली असता "आम्हाला गावात राहावे लागते" असे उत्तर दिल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसहसचिव राजू देसले म्हणाले.
इथल्या खुर्च्या आमदारांच्या कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाल्याचेही राजू देसले म्हणाले. राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, शिवप्रेमी या मोर्चासाठी आले असून पाहुण्यांचे आदरतिथ्य करायची इथल्या आमदारांची ही पद्धत आहे का? असा सवाल करीत काहीही झाले तरी आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढत आहोत असे राजू देसले म्हणाले.