Big news रॉयल एनफिल्डच्या गोडाऊनला अचानक भीषण आग; ३-४ बुलेट जळून खाक, १५ लाखांचे नुकसान....

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा शहरातील खामगाव रोड परिसरात रॉयल एनफिल्ड कंपनीच्या दुचाकी गोडाऊनला बुधवारी (७ ऑक्टोबर) दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या आगीत तीन ते चार बुलेट मोटारसायकली जळून खाक झाल्याची माहिती आहे. तसेच गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेले दुचाकींचे स्पेअर पार्ट्स आणि इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. काही अन्य दुचाकींचेही नुकसान झाल्याचे समजते.

आगीची माहिती मिळताच बुलढाणा नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझविण्यास सुरुवात केली. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यामुळे आगीचा परिसरातील इतर भागात फैलाव होण्याचा मोठा धोका टळला.

दरम्यान, या आगीत सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नुकसानीचा नेमका आकडा पंचनामा आणि तपासानंतर स्पष्ट होणार आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.