BIG NEWS राज्यात शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटणार! फसव्या कर्जमाफीच्या विरोधात शेतकरी नेते रविकांत तूपकरांचे उद्यापासून अन्नत्याग आंदोलन! म्हणाले, जीव गेला तरी माघार नाही;

 कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी ! तुपकरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर...
 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यभरात शेतकरी आंदोलनाचा वणवा आता पेटणार आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कर्जमाफी प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे, राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना फसवी असून या योजनेत लादलेल्या अटी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवणार असल्याचा आरोप करीत तुपकर यांनी आंदोलनाचे शस्र उपसले आहे.उद्या, १५ जूनपासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा तुपकर यांनी केली आहे. "आता जीव गेला तरी माघार नाही, शेतकऱ्यांसाठी बलिदान द्यायची आपली तयारी आहे. तसेही सरकारला शेतकऱ्यांचे बळी घ्यायचे आहेत,त्यामुळे माझा बळी घ्या पण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या.. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वणवा पेटला तर तो विझवायला देखील पाणी कमी पडेल,त्यामुळे सरकारनं आमचा इशारा ध्यानात ठेवावा" असे खडे बोल रविकांत तुपकर यांनी सुनावले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रविकांत तुपकर यांनी फसव्या कर्जमाफीच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केल्यामुळे राज्य सरकार सह शेतकऱ्यांचेही लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची स्टाईल पाहता पोलिस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. उद्या ,१५ जूनला सकाळी ९ वाजता बुलडाणा येथील निवासस्थानासमोर रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत. 

जिल्हासह राज्यभरातील शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुलढाण्यात येण्याची चिन्हे पाहता आंदोलन तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये विविध बंधने घालून अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या बाहेर ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरणारा हा शासन निर्णय असून शासनाने सरसकट कर्जमाफी करण्याचे सोडून विविध अटी शर्ती घालून कर्जमाफीचा लाभ मर्यादित केला आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून होणार आहे. राज्य शासनाने वेळीच आंदोलनाची दखल घेऊन कर्जमाफी योजनेच्या अटी शिथिल न केल्यास रविकांत तुपकर यांच्या या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटू शकतो...