BIG NEWS राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; बुलढाण्याचे सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार विविध सवलती, शासनाचा जीआर जारी
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत पिके वाळू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर राज्य सरकारच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी कोणत्या सवलती मिळणार?
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये शासनाकडून विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती यांचा समावेश आहे. तसेच कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सवलत देणे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांत शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
पाणीटंचाई, चारा आणि रोजगारासाठीही उपाययोजना
पाणीटंचाई असलेल्या भागांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे आणि पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या उपाययोजनाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये लागू होणार आहेत.बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने आता या सवलतींची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी सुरू होते आणि शेतकऱ्यांना कोणत्या स्वरूपात मदत मिळते, याकडे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.