BIG NEWS : “दुष्काळ संघर्ष यात्रा चिरडण्यासाठी सरकारकडून कटकारस्थान; आमच्या हालचालींवर पाळत, साध्या वेशातील पोलीस अन् गुप्तचर यंत्रणेचे लोक यात्रेत!”

 देवधाब्यात रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप; “तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही मागे हटणार नाही! ४ डिसेंबरला बुलढाण्यात शेतकऱ्यांची ताकद दाखवू!” सरकारला थेट इशारा.!दुष्काळ संघर्ष यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद...

 
 मलकापूर (बुलढाणा लाईव्ह वृत्तसेवा ) : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत दुष्काळ संघर्ष यात्रेवर निघालेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यात्रेच्या पहिल्याच दिवशी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “आमची दुष्काळ संघर्ष यात्रा चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. साध्या वेशातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेचे लोक यात्रेत पाठवण्यात आले आहेत. मात्र, सरकारने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही घाबरणार नाही. आमचं सगळं उघड आहे. तुम्हाला जे करायचं ते करा, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा संघर्ष थांबणार नाही,” अशा शब्दांत तुपकरांनी सरकारला थेट आव्हान दिले. काल, १४ नोव्हेंबर रोजी मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे दुष्काळ संघर्ष यात्रेच्या पहिल्या दिवसातील शेवटच्या सभेत ते बोलत होते. या सभेला शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता..

१४ नोव्हेंबरला मलकापूर येथून रविकांत तुपकर यांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील गावागावांतून ही यात्रा मार्गक्रमण करणार असून, ४ डिसेंबरला बुलढाणा येथे यात्रेचा समारोप आणि एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी विविध गावांमध्ये शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रात्री मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे झालेल्या सभेतही नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

“कुत्रा दगडाला डसत नाही, दगड ज्या दिशेने आला त्या दिशेने जातो!”

यावेळी तुपकरांनी सरकारवर टीका करताना आक्रमक शब्दांत इशारा दिला. “कुत्रा दगडाला डसत नाही, दगड ज्या दिशेने आला त्या दिशेने जातो. आमचं पोलिसांशी भांडण नाही. पोलीस आपलेच भाऊ आहेत. मात्र, आमच्या अंगावर पोलीस पाठवणाऱ्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,” असे तुपकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “आमच्या यात्रेत कोण येतंय, कोण जातंय, आम्ही कुठे मुक्काम करतोय, कुणाशी बोलतोय, यावर लक्ष ठेवले जात आहे. साध्या वेशात पोलीस पाठवले आहेत. गुप्तचर यंत्रणेची माणसं आमच्यात फिरत आहेत. पण आम्हाला त्याची चिंता नाही. आमचं आंदोलन उघड आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय, कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

सोयाबीन ,कापसाला भाव द्या, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मेंढपाळांसाठीही विशेष पॅकेजची मागणी!

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे कापसाला दरवाढ मिळावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी हा संघर्ष सुरू असल्याचे तुपकरांनी सांगितले.
विशेष म्हणजे, या आंदोलनात मेंढपाळांच्या प्रश्नांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील मेंढपाळांवर आंतरजिल्हा चराईसाठी असलेले निर्बंध रद्द करावेत, अशी मागणी तुपकरांनी केली. तसेच २०१९ मधील अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेल्या शेळ्या-मेंढ्यांची नुकसानभरपाई देण्यात यावी आणि सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मेंढपाळ व पशुपालकांसाठी सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी देवधाबा येथील सभेत केली.

“४ डिसेंबरला बळीराजाची ताकद दाखवू; अभी तो शुरुआत है!”

दुष्काळ संघर्ष यात्रा ४ डिसेंबरला बुलढाण्यात पोहोचणार आहे. त्यादिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत जिजामाता प्रेक्षागृह परिसरात शेतकऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन तुपकरांनी केले.
“४ डिसेंबरला बुलढाण्यात बळीराजाची ताकद काय असते, हे सरकारला दाखवून देऊ. गावागावांतून शेतकरी बुलढाण्यात पोहोचले पाहिजेत. सरकारला एकच सांगतो, अभी तो शुरुआत है! महाराष्ट्र हादरून सोडला नाही तर शेतकऱ्याची औलाद सांगणार नाही,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, दुष्काळ संघर्ष यात्रेच्या पहिल्याच दिवशी गावागावांत मिळालेला प्रतिसाद आणि देवधाबा येथील सभेत तुपकरांनी सरकारवर केलेले गंभीर आरोप यामुळे या आंदोलनाकडे लक्ष वेधले गेले आहे. आगामी वीस दिवसांत जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये ही यात्रा जाणार असून, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.