BIG NEWS बाेगस बियाणे विक्री भाेवली; २७ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित! शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ; तक्रारींचा ओघ वाढला!
Jul 17, 2025, 15:59 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकऱ्यांना बाेगस बियाण्यांची विक्री करणे जिल्ह्यातील २७ कृषी केंद्र संचालकांना चांगलेच भाेवले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने या कृषी केंद्राचे परवाने निलंबीत केले आहेत. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील काही कृषी सेवा केंद्रांवर बोगस बियाणे विक्री, साठवणूक व लबाडीच्या तक्रारींनंतर कारवाई करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बियाण्यांची उगमशक्ती अत्यल्प असल्याचेही निदर्शनास आले आहे. बनावट माल विकणाऱ्या विक्रेत्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हे दाखल करून परवाने रद्द किंवा निलंबित करण्याची कारवाई केली जात आहे.
खरीप हंगामात बनावट बियाण्यांमुळे पीक उगवले नसल्याच्या ३२० तक्रारी जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांतून प्राप्त झाल्या. काही बियाण्यांमध्ये उगमशक्ती ३० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बनावट बियाण्यांमुळे उगम न झालेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असून, त्यावर अतिरिक्त खर्च येतो. पावसाच्या अनियमिततेमुळे दुबार पेरणीचा काळही घटतो, त्यामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवते. त्यामुळे, कृषी विभागाने बाेगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्र संचालकांवर कठार कारवाई सुरू केली.