BIG NEWS! मतदानाला काही तास शिल्लक, तरीही किरण सरनाईकांचे प्रचार बॅनर बुलडाण्यात कायम!किरण सरनाईकांकडे प्रचाराचे बॅनर काढायला बुलढाण्यात माणसं नाहीत? 

प्रचार संपल्यानंतरही फलक हटवले नाहीत; आचारसंहिता भंगाप्रकरणी गुन्हा दाखल होणार का?

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ जवळ येऊन ठेपली असताना निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतरही बुलडाणा शहरात शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराचे बॅनर झळकत असल्याचे चित्र समोर आले आहे. इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आपापले प्रचारफलक हटवले असताना सरनाईक यांचे बॅनर मात्र कायम कसे? उमेदवारांच्या यंत्रणेला प्रचाराचे बॅनर काढण्यासाठी माणसे मिळत नाहीत का? की निवडणूक आचारसंहितेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

 

प्रचार संपला, पण बॅनर हटवण्याचे भान कुठे?

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत संपल्यानंतर निवडणूक प्रचाराशी संबंधित बाबींवर आदर्श आचारसंहितेनुसार निर्बंध लागू होतात. अशा परिस्थितीत शहरातील सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांच्या प्रचाराचे बॅनर कायम राहणे हा चर्चेचा विषय बनला आहे.

बुलडाणा शहरातील संगम चौकासह अनेक ठिकाणी गुरुवारी रात्री ७ वाजेपर्यंत किरण सरनाईक यांच्या प्रचाराचे बॅनर झळकत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, इतर उमेदवारांचेही प्रचारफलक शहरात लावण्यात आले होते. मात्र, संबंधित उमेदवारांच्या प्रतिनिधींनी ते हटविल्याचे चित्र आहे. मग सरनाईक यांच्या प्रचारफलकांबाबतच ही उदासीनता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यमान आमदारांच्या प्रचार यंत्रणेकडून इतकी बेफिकिरी का?

निवडणुकीसाठी उमेदवार प्रचार करताना मोठी यंत्रणा उभी करतात. सभा, भेटीगाठी, प्रचारफेऱ्या आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, प्रचाराची मुदत संपल्यानंतर प्रचारसाहित्य हटविण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरते.

अशा वेळी विद्यमान आमदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या किरण सरनाईक यांच्या प्रचाराचे बॅनर मतदानाच्या आदल्या दिवशीही शहरात कायम असणे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. इतर उमेदवारांनी प्रचारफलक हटविले असताना सरनाईक यांच्या प्रचार यंत्रणेला ते हटविण्यासाठी वेळ मिळाला नाही का, असा बोचरा सवाल उपस्थित होत आहे.

आचारसंहितेचा भंग झाला का? प्रशासन कारवाई करणार?

या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, प्रचाराची मुदत संपल्यानंतरही कायम असलेल्या या बॅनरांवर निवडणूक प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? संबंधित ठिकाणांची पाहणी करून बॅनर हटविण्याचे आदेश दिले जाणार का? तसेच, परिस्थितीनुसार आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची नोंद घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार का?

आता निवडणूक प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष!

मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना बुलडाणा शहरात प्रचाराचे बॅनर कायम असल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे. संगम चौकासह इतर ठिकाणी दिसलेल्या या बॅनरांची निवडणूक प्रशासन दखल घेणार का, संबंधितांना ते हटविण्याचे निर्देश देणार का आणि आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत काही कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रचार संपल्यानंतरही बॅनरबाजी कायम राहणार की निवडणूक प्रशासन कारवाईचा बडगा उगारणार? मतदानाच्या पूर्वसंध्येला उपस्थित झालेल्या या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाच्या भूमिकेतूनच स्पष्ट होणार आहेत.