मोठी बातमी! जिल्ह्यात मुसळधार पावसाची धास्ती; पेनटाकळी धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता! नदीकाठच्या "या"१७ गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

 
 जानेफळ (अनिल मंजुळकर: प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असतानाच आता आणखी एक महत्त्वाची सूचना प्रशासनाने जारी केली आहे. पेनटाकळी मोठा पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार पेनटाकळी धरणाच्या वक्रद्वारातून नदीपात्रात कधीही पाण्याचा विसर्ग सोडावा लागू शकतो, असा इशारा पूर नियंत्रण कक्षाने दिला आहे.

सद्यस्थितीत पेनटाकळी प्रकल्प ५० टक्के भरला असून मंजूर जलाशय व द्वार परिचालन सूचीनुसार जुलैअखेर धरणातील जलस्तर ६९ टक्क्यांपर्यंत नियंत्रित ठेवण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने पेनटाकळी, दुधा, रायपूर, नांद्रा, पाचला, बाऱ्हई, भालेगाव, गौंढाळा, कंबरखेड, नेमतापूर, फरदापूर, मेहकर, सारंगपूर, अंत्री देशमुख, बोरी, सोनाटी आणि गणपूर या गावांतील नागरिक, शेतकरी व गुराखी यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट केले आहे.

नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर करू नये, असे आवाहन पूर नियंत्रण कक्षाने केले आहे. विशेषतः शेतकऱ्यांनी नदीलगतच्या शेतांमध्ये काम करताना सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही केवळ पूर्वसूचना असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.