मोठी बातमी! मुंबईत कर्जमुक्तीचे आंदोलन आणखी चिघळले; रविकांत तुपकरांना ताब्यात घेताच कार्यकर्त्यांचा नवा एल्गार;
मंत्रालयासमोरील झाडावर गळ्यात फास अडकवून आंदोलन, पोलिसांनी पकडल्यास उडी मारण्याचा इशारा...
यापूर्वी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह धडक देत सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने भिरकावल्या होत्या. तसेच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले.
दरम्यान, तुपकरांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते मंत्रालयासमोरील परिसरात पोहोचले. त्यांनी थेट झाडावर चढत आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी गळ्यात फास अडकवला असून, पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यास झाडावरून उडी मारून गळफास घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सरकारने सरसकट कर्जमुक्तीबाबत तातडीने बैठक बोलवावी; बैठक लावत नाही तोपर्यंत झाडावरून खाली उतरणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
याचवेळी आंदोलनकर्त्यांच्या हातात सुतळी बॉम्ब असल्याचे दिसून आले. हे सुतळी बॉम्ब फोडून ते झाडावरून खाली फेकत असल्याने मंत्रालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला असून पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी आज विधानभवनासमोर आक्रमक आंदोलन छेडले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्या अटकेनंतर समर्थकांनी मंत्रालयासमोरील झाडावर चढून अत्यंत आक्रमक आंदोलन सुरू केल्याने मुंबईतील शेतकरी आंदोलनाला आणखी तीव्र वळण मिळाले आहे.