मतदार यादीत मोठी हालचाल सुरू! तुमचे नाव मतदार यादीत राहणार का? बुलढाण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 जून ते 29 जून 2026 या कालावधीत तयारी, प्रशिक्षण आणि Enumeration Form छपाईची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पी. एम. साने (NLMT) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधिर खांदे, उपजिल्हाधिकारी अजिंक्य घोडके, उपविभागीय अधिकारी सुहासिनी गोनेवार, उपविभागीय अधिकारी जयश्री ठाकरे, तहसीलदार वृशाली केसकर आणि तहसीलदार संजीवनी मुपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशिक्षणादरम्यान नवीन मतदार, स्थलांतरित मतदार आणि मयत मतदारांच्या नोंदी अचूकपणे कशा कराव्यात, अर्ज भरण्याची प्रक्रिया, माहितीची पडताळणी आणि डेटा अद्ययावतीकरणाची कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेदरम्यान एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि मतदार यादीतील त्रुटी दूर व्हाव्यात, यासाठी काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.मतदार यादीची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, येत्या काळात जिल्हाभरात बीएलओंकडून घराघरांत जाऊन पडताळणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.