घरफोड्यांनंतर बुलढाण्यातील नागरिकांचा मोठा निर्णय! "आपली सुरक्षा आपल्या हाती" म्हणत रात्री सुरू होणार जागता पहारा!
खालीद बिन वलीद नगरमध्ये ४० सदस्यीय मोहल्ला सुरक्षा समितीची स्थापना; दररोज चार जणांची रात्री गस्त...
काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री खालीद बिन वलीद नगर परिसरातील तीन घरे फोडून दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी १९ जुलै रोजी परिसरातील नागरिकांची स्वयंस्फूर्तीने बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत सर्वानुमते ४० सदस्यीय मोहल्ला सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या नियोजनानुसार दररोज रात्री १ ते ५ या वेळेत चार नागरिक संपूर्ण परिसरात गस्त घालणार आहेत. गस्तीदरम्यान संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती दिली जाणार आहे.
बैठकीत नागरिकांना सुरक्षेसंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. रात्री घरासमोरील दिवे सुरू ठेवणे, बाहेरगावी जाताना शेजारी किंवा विश्वासू व्यक्तींना माहिती देणे, घरांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच परिसरात अनोळखी व्यक्तींची वर्दळ दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.बैठकीला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकजुटीने पुढाकार घेत परिसर सुरक्षित ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, या उपक्रमाचे परिसरात स्वागत होत आहे.