बिग ब्रेकिंग! जिल्ह्यातील ओल्या दुष्काळावर अखेर शिक्कामोर्तब!!

अंतिम पैसेवारी ४६; जळगाव जामोद तालुक्यातील खरिपाची स्थिती सर्वात भीषण
 
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाऊस कधी भिजवितो, आनंद देतो, दाता ठरतो, जीवन ठरतो, पाऊस कधी रुद्र ठरतो, ठरतो काळ अन्‌ अन्नदात्याला छळ छळ छळतो... सन २०२१ मधील पावसाळा कृषिप्रधान जिल्ह्याला अन्‌ ५ लाखांवर शेतकऱ्यांना छळणारा ठरला. नियमित पावसाळ्यात धोधो कोसळणाऱ्या वरूनराजाने त्यानंतरही अवेळी हजेरी लावत साडे सात लाख हेक्टरवरील खरीप पिके, हंगाम आणि लाखो शेतकऱ्यांच्या डोळ्यात फुललेल्या हिरव्या स्वप्नांना उद्‌ध्वस्त केले, केलंय जमीनदोस्त. यामुळे जिल्ह्याला कधीचीच भीषण दुष्काळाची चाहूल लागली, खात्री झाली, पण... यावर किंबहुना या भीषण वास्तवावर सरत्या वर्षात शिक्कामोर्तब झालंय! 

शासनाने आजपासून निर्बंध लावले असले तरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात थर्टिफर्स्ट धुमधडाक्यात साजरा होणार, दारूचा महापूर वाहणार हे नक्की. मात्र दुसरीकडे आपाद्‌ग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूंचा महापूर साचलेला राहणार याकडे पाहायला कुणालाच वेळ नसणार हे कटू सत्यच! मात्र आज जवळपास घोषित झालेल्या दुष्काळामुळे त्यांना दिलासा मिळेल का हा यक्षप्रश्न आहे. आज खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर झालीय.

जिल्ह्यातील सर्व १३ तालुके अन्‌ १४१९ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. जळगाव जामोद तालुक्याची सर्वात कमी म्हणजे ४१ इतकी पैसेवारी असल्याने खरीप हंगाम नावापुरता ठरलाय. जळगावच नाय तर इतर १३ तालुक्यांतील खरिपाची शोकांतिका सांगणारा हा सरत्या वर्षातील हा अधिकृत अन्‌ भीषण अहवाल आहे. नांदुरा,संग्रामपुराची ४५ तर बुलडाणा व मलकापूर तालुक्याची पैसेवारी ४६ आहे. याशिवाय चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, मोताळा, खामगाव ,शेगाव  तालुक्यातील पैसेवारी ४७ निघाली आहे. देऊळगाव राजा या एकमेव तालुक्याचा आकडा ४८ इतका आहे. जिल्ह्याची सरासरी ४६ इतकी असून यामुळे खरीप हंगाम अन्‌ लाखो शेतकरी किती व कसे उद्‌ध्वस्त झाले हे स्पष्ट होते.

पिकांचेही बेहाल...
सोयाबीनचा तब्बल ४ लाख ४ हजार ८३३ हेक्टरवर पेरा झाला होता. मात्र अतिवृष्टीने या पिवळ्या सोन्याचे मातेरे झाले. या पिकाची पैसेवारी ४६ इतकी निघाली असून, यामुळे उतारा किती कमी हे सिद्ध होते. १ लाख ८१ हजार २७८ हेक्टरवर पेरा झालेल्या कपाशीची पैसेवारी ४६ इतकी म्हणजे त्याचाही बोजवारा उडालाय! १६ हजार ६९५ हेक्टरवर पेरा असलेल्या मकाची पैसेवारी ४७ आली. प्रमुख तिघा पिकांसह खरीप हंगामाची ही पैसेवारी पुरेशी आहे दुष्काळ जाहीर करण्यासाठी! मात्र संवेदना हरवलेले राज्यकर्ते अधिकृत घोषणा कधी करतात याकडे सरत्या वर्षातच ५ लाखांवर कास्तकाराचे लक्ष लागले आहे. जिल्हा हॅपी न्यू इअरचा दंगडो करीत असताना बळीराजांचे मायबाप नवीन वर्षात तरी अश्रू पुसणार काय अन्‌ त्यांना ठोस मदत करणार काय, हा सरत्या वर्षाचा अस्वस्थ करणारा सवाल...