पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात आज १५ कोटींच्या आयुष रुग्णालयाचे भूमिपूजन; प्रतापराव जाधवांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ!

 ५० खाटांचे आयुष रुग्णालय उभारणार; दिव्यांग तपासणी, महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन, टीबी रुग्णांना पोषण किटसह विविध उपक्रमांचे आयोजन

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात आज, १७ सप्टेंबर रोजी, आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय आयुष मिशनअंतर्गत बुलढाण्यात उभारण्यात येणाऱ्या ५० खाटांच्या, १५ कोटी रुपये खर्चाच्या आयुष रुग्णालयाचे भूमिपूजन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमात जिल्हास्तरीय ‘सेवा संकल्प अभियानाचे’ उद्घाटनही करण्यात येणार आहे.

ADVT👆🏻 

राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रुग्णालय परिसरात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नव्या आयुष रुग्णालयामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांच्या अधिक सुविधा उपलब्ध होणार असून आयुर्वेदाचा प्रसार आणि त्याचा उपचारांसाठी अधिक वापर वाढविण्याचा उद्देश आहे.

आरोग्याशी संबंधित विविध उपक्रम

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत दिव्यांगांची तपासणी करून आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. महिलांसाठी स्तन व गर्भाशयाशी संबंधित आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, तर ‘टीबीमुक्त भारत’ अभियानांतर्गत रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले जाणार आहे.

याशिवाय स्त्री रुग्णालयातील रुग्णांशी संवाद, फळवाटप आणि वृक्षारोपण असे उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय गायकवाड राहणार असून नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रविण देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले आणि स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे.

किडनी प्रत्यारोपणापासून बायपासपर्यंत उपचारांसाठी मदत

दरम्यान, ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये किडनी प्रत्यारोपण, मणक्यांच्या शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास तसेच हिप व गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांसाठी मदतीचा समावेश आहे.

या सुविधांचा लाभ घेण्यासाठी गरजू रुग्णांनी बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागारातील केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधावा. तसेच ८८३०३३०७५४ आणि ९५५२१०५७५० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून आरोग्यविषयक विविध सुविधा आणि सेवा थेट गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.