असल्या भामट्यांपासून सावधान! बुलडाण्याच्या प्रशासकीय इमारतीजवळ धक्कादायक प्रकार! आधी हातावर दोन हजार टेकवले, म्हणे गरिबांना दान करा....नंतर दाखवला खरा अवतार...
May 21, 2025, 09:59 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गरिबांना मदत करण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी पानटपरी चालकाची फसवणूक करत सुमारे एक तोळ्याची सोनसाखळी लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजता प्रशासकीय इमारतीजवळ घडली. सोन्याचा स्पर्श लागल्यास पैसे पावन होतील, असे सांगत त्यांनी विश्वास बसवून ही चोरी केली. काही वेळातच फसवणूक लक्षात येईपर्यंत भामटे तेथून पसार झाले.
विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी सीताराम राजाराम सवडतकर यांची प्रशासकीय इमारतीजवळ पानटपरी आहे. मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० वाजता ५० ते ६० वयोगटातील दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या पानटपरीवर आल्या. त्यांनी सवडतकर यांना शनिमंदिराचा पत्ता विचारला, जो त्यांनी नम्रतेने सांगितला. त्यानंतर त्या दोघांपैकी एकाने त्यांच्या हातात दोन हजार रुपये देत, हे पैसे गरिबांना दान करा, असे सांगितले.
सवडतकर यांनी नकार देत पैसे परत केले. त्यावर त्यांनी पैसे एका कागदी पुडीत ठेवून, त्या पुडीला गळ्यातील सोनसाखळी व अंगठ्यांचा स्पर्श केल्यास ते पावन होतील, असे सांगितले. सवडतकर यांनी भामट्यांच्या सांगण्यानुसार, गळ्यातील सोनसाखळी काढून त्यांच्यापैकी एकाच्या स्वाधीन केली. त्याने ती सोनसाखळी पैसे ठेवलेल्या कागदी पुडीला स्पर्श करून पुन्हा ती एका वेगळ्या पुडीत बांधली आणि ती थैलीत टाकल्याचा देखावा केला. ही थैली सवडतकर यांच्या हातात देत, ही गोष्ट कोणालाही सांगू नका, १५ मिनिटांनी पुडी उघडा, पैसे गरिबांना वाटा आणि सोनसाखळी तुमच्याकडेच राहू द्या, असे सांगून दोघेही प्रशासकीय इमारतीकडे निघून गेले. काही वेळानंतर सवडतकर यांना संशय आल्याने त्यांनी थैलीतील पुडी उघडून पाहिली; मात्र त्यात सोनसाखळी किंवा पैसे नसून तंबाखूच्या पुड्या आढळल्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बसस्थानक परिसरातील सीसी कॅमेऱ्यांची फुटेज तपासले जाणार आहे.