बुलढाणेकरांनो सावधान! येळगाव धरणात केवळ १७ टक्केच जलसाठा, पाणी जपून वापरा..
May 10, 2024, 11:44 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणेकरांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या येळगाव धरणात केवळ १७ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याचे वृत्त आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत हा जलसाठा पुरणार असून जून महिन्याच्या प्रारंभी दमदार पावसाची अपेक्षा आहे.
येळगाव धरण बुलडाणा शहरासह लगतच्या गाव खेड्यांना पाणी पुरवठा करणारे धरण आहे. धरणाची एकूण व्याप्ती १२.४० दशलक्ष घनमीटर इतकी असून वर्तमान स्थितीत ६.५० दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी मान्सून अखेरीस दमदार पाऊस झालेला होता. त्यामुळे धरण फुल्ल झाले होते. परंतु यंदा उन्हाची तीव्रता अधिक असून बाष्पीभवन देखील सपाट्याने होत आहे. भविष्यात पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता बुलढाणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील काही दिवसात भीषण पाणीटंचाई टाळण्यासाठी आत्ताच सावधान होणे गरजेचे आहे.