पंचायत समितीत शाळा भरवताच बेलगावच्या शाळेला मिळाले शिक्षक; शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांच्या घाेषणांनी दणाणला मेहकर पंचायत समितीचा परिसर !
Sep 5, 2025, 11:24 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील जिल्हा परिषद शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी निवेदने दिली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने अखेर विद्यार्थ्यांची शाळा मेहकर पंचायत समितीत भरवली. त्यानंतर अखेर दाेन शिक्षकांची या शाळेवर प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एक शिक्षक रुजूही झाले आहेत. विशेष म्हणजे या शाळेतील शिक्षक सेविकेची प्रतिनियुक्तीच्या नावाखाली बदली करण्यात आली. त्यामुळे, पालक आक्रमक झाले आहेत.
मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांन केली. मात्र, या मागणीची दखल तर घेण्यात आलीच नाही उलट येथे एक महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या शिक्षण सेविकेची थेट पंचायत समिती बदलून प्रतिनियुक्ती करण्यात आली. त्यामुळे, सातव्या वर्गासाठी शिक्षकच उपलब्ध नाहीत. त्यामुळे, विद्यार्थी व पालकांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येलाप मेहकर पंचायत समितीतच शाळा भरवली.
तसेच शिक्षक देण्याची मागणी केली. मेहकर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका येथून सदर बदली प्रक्रियेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत विद्यार्थी व पालकांनी पंचायत समिती मेहकर पर्यंत पैदल प्रभात फेरी काढून शासनाच्या बेजाबाबदार व्यवस्थेचा कारभार चव्हाट्यावर आणला. सदर प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील यांनी पंचायत समिती गाठून विद्यार्थी व पालक यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या सदर मागण्यांमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या एका महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी दहा पंधरा दिवस दोन अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून एका महिन्याचा शैक्षणिक तुटवडा भरून काढण्याचे मान्य केले. तसेच आजच एक शिक्षक तात्पुरती व्यवस्था म्हणून शाळेवर रुजू करून दिला आणि शिक्षण सेवक असलेल्या हुमेरा सालेहा मोहम्मद साफिर या शिक्षकाची बदली प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.