साखरखेर्डा आठवडी बाजारात मधमाशांचा हल्ला; २० जण जखमी, नागरिकांची धावपळ...
Mar 21, 2026, 09:01 IST
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गेल्या दोन दिवसांपासून साखरखेर्डा येथील आठवडी बाजारात मधमाशांनी धुमाकूळ घातल्याने व्यापारी व ग्राहकांमध्ये मोठी तारांबळ उडाली आहे. अनेकांना दंश झाल्याने नागरिक सैरावैरा पळू लागले. ही घटना आज, २० मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजता घडली.
आज आठवडी बाजार असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने मांडली होती. ग्राहकांची मोठी गर्दी असताना बाजारातील एका मोठ्या झाडावरील आग्या मोहळ अचानक उठले. काही कळण्याआधीच मधमाशांनी नागरिकांवर हल्ला चढवला. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक बचावासाठी इकडे-तिकडे पळू लागले. या गोंधळात सुमारे १५ ते २० नागरिकांना मधमाशांनी दंश केला. जखमींनी तातडीने रुग्णालयात जाऊन उपचार घेतले.
दरम्यान, याच प्रकारची आणखी एक घटना काल, १९ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा, साखरखेर्डा येथील इमारतीच्या गच्चीवरील आग्या मोहळ उठल्याने एका वयोवृद्ध व्यक्तीवर हल्ला झाला. झिने नामक व्यक्ती गंभीर जखमी झाली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांच्या अंगावर चादर ओढून बचाव करण्याचा प्रयत्न केला. अमित जाधव, बबलू पवार यांच्यासह काही युवकांनी झिने यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. साखरखेर्डा गावात विविध ठिकाणी आग्या मोहळ आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने या मधमाशांच्या पोळ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.