"बीडीओं'चा कारनामा सीईओंच्या दरबारी !

चिखली तालुक्‍यातील शेतकऱ्याचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जलसिंचन विहिरीसाठी पात्र लाभार्थी म्‍हणून निवड झाल्यानंतरही चिखली पंचायत समितीचे कर्मचारी आणि गटविकास अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. दुसऱ्याच अपात्र लाभार्थ्याला विहिरीचा लाभ दिल्याचा संशय वर्तवून या प्रकरणाच्या चौकशीसाठी लाभार्थी देवकाबाई नारायण कोल्हे यांच्यातर्फे त्‍यांचा मुलगा ज्ञानेश्वर (रा. करवंड ता. चिखली) हे बुलडाणा जिल्हा परिषदेसमोर आज, १७ नोव्‍हेंबरपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

श्री. कोल्हे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्‍हटले आहे, की जलसिंचन योजनेत करवंड ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार १५ ऑगस्‍ट २०१७ मध्ये श्रीमती देवकाबाई नारायण कोल्हे यांची पात्र लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली होती. पंचायत समितीकडे कागदपत्रांसह ठरावाची प्रत सुध्दा पाठविण्यात आली. मात्र अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.

अधिकाऱ्यांना विचारले तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात. यामुळे दुसऱ्या अपात्र लाभार्थीस लाभ दिल्याचा संशय असून, आम्हाला पात्र असूनही वंचित ठेवले आहे. अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचेही निवेदनात म्‍हटले आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा निर्धार ज्ञानेश्वर यांनी व्यक्‍त केला.