घरकुलासाठी रेती मिळत नसल्याने बावनकुळे संतापले; तहसीलदार-एसडीएमला धरले धारेवर! “तुमचा रिपोर्ट बडतर्फीचा आहे”;

 वाळू चोरीवरून अधिकाऱ्यांना खडेबोल, शेतकऱ्यांच्या केबल चोरीच्या तक्रारीवर एसपींना तातडीने फोन

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पावसाचा खंड पडल्याने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाणा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात मलकापूर तालुक्यातील रणथम येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना घरकुलांसाठी रेती उपलब्ध होत नसल्याची तक्रार समोर आली. यावर बावनकुळे यांनी संबंधित तहसीलदार आणि एसडीएम यांच्याकडे थेट जाब विचारत नाराजी व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती मिळत नसल्याची व्यथा मांडताच बावनकुळे यांनी वाळू चोरीचा मुद्दा उपस्थित केला. “रेती माफिया वाळू चोरी करतात, तुमच्या दोघांचंही याकडे लक्ष नाही का?” असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
तसेच, “किती गाड्या रस्त्याने वाळू घेऊन चालल्या आहेत, हे तुम्हाला दाखवू का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी वाळू वाहतुकीवर प्रशासनाचे नियंत्रण कितपत आहे, याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

घरकुलांसाठी रेतीचा साठा का नाही?

घरकुल लाभार्थ्यांना नियमानुसार रेती उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगत बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. “घरकुलासाठी दहा टक्के रेतीचा साठा उपलब्ध ठेवावा लागतो, हे तुम्हाला माहिती आहे ना? मग तो का ठेवत नाही?” असा सवाल त्यांनी केला.

अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करताना बावनकुळे यांनी “तुमचा रिपोर्ट एकदम वाईट आहे. तुमचा रिपोर्ट बडतर्फीचा रिपोर्ट आहे,” अशा शब्दांत सुनावले. घरकुलासाठी वाढीव रेती उपलब्ध करून देण्याचा मुद्दा आमदारांनी विधानसभेतही उपस्थित केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.“तुमचा यावर कंट्रोल नाही,” असे म्हणत त्यांनी वाळू चोरी आणि घरकुलासाठी रेती उपलब्धतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली.

केबल चोरीच्या तक्रारीवर एसपींना फोन

दरम्यान, रणथम परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील केबल तसेच वीज वाहिन्यांच्या तारा चोरीला जाण्याच्या घटनांची माहिती महसूल मंत्र्यांना दिली.
शेतकऱ्यांची तक्रार गांभीर्याने घेत बावनकुळे यांनी तत्काळ बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी एसपींना दिल्या.रणथम येथील पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनाच थेट प्रश्न विचारल्याने त्यांच्या दौऱ्याची परिसरात चर्चा रंगली.