सिंदखेडराजा गोरक्षकांवर हल्ला! हिंदुत्ववादी संघटनांचा रास्ता रोको...भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे संतापले, म्हणाले..कारवाई नाही झाली तर याद राखा...
Updated: Jun 7, 2026, 10:36 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजात शनिवारी दुपारी चांगलाच तणाव निर्माण झाला. गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, शहरातील उघड्यांवरील प्रमुख मानस विक्रीचे दुकाने हटवावीत या मागणीसाठी नागरिकांनी बसस्थानकासमोरही रास्ता रोको आंदोलन केले..दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस प्रशासन व इतर यंत्रणांशी संपर्क साधला. गोरक्षकांवर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही..तुम्ही जनभावना लक्षात घेऊन तातडीने कारवाई करा.. आमच्या संतापाची परीक्षा पाहू नका असा इशाराच त्यांनी यंत्रणेला देऊन टाकला..
प्राप्त माहितीनुसार, 'गो सेवा सन्मान' अभियानांतर्गत राजस्थान येथील प्रल्हादसिंग, बाळकृष्ण महाराज आणि केशव नागर हे सिंदखेडराजा मार्गे प्रवास करीत होते. यावेळी त्यांना गोवंश वाहतूक करणारा टेम्पो दिसल्याने त्यांनी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शहरातील विश्रामगृह परिसरात काही नागरिक जमा झाल्याने तेथून निघालेल्या गो रक्षकांना बसस्थानक परिसरात काही जणांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक पोलिस ठाण्यात जमा झाले. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करीत दुपारी आंदोलनकर्त्यांनी बसस्थानकासमोर रास्ता रोको सुरू केला.
उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम आणि पोलिस निरीक्षक आशिष इंगळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी आरोपींना अटक करण्याबरोबरच बसस्थानक, ऐतिहासिक प्रवेशद्वार आणि रामेश्वर मंदिर परिसरातील उघड्यावरील मांसविक्रीची दुकाने हटविण्याची मागणी कायम ठेवली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.