आणखी एक उमेदवार! अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अदिती पोहरे उतरणार; उच्चशिक्षित नेतृत्व, अध्यापनाचा अनुभव अन् राजकीय वारशामुळे निवडणुकीत रंगणार नवी चुरस..
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज असल्याचे समर्थक शिक्षकांचे म्हणणे आहे. वेतन, सेवाशर्ती, पदोन्नती, अनुदान, शैक्षणिक धोरणे तसेच विविध प्रशासकीय अडचणी यांसारखे प्रश्न शासनदरबारी सातत्याने आणि प्रभावीपणे मांडण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर अदिती पोहरे यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी शिक्षकांकडून आग्रह करण्यात आला. शिक्षकांच्या आग्रहातूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने मांडण्याचा निर्धार त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवी चर्चा आणि नवी राजकीय समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राजकीय बाळकडू अन् शिक्षण क्षेत्राचा वारसा
सौ. अदिती ऋषिकेश पोहरे या माजी कृषी मंत्री हर्षवर्धन उर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा वारसा लाभला आहे. लहानपणापासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणाचा अनुभव मिळाल्याने विविध प्रश्नांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
राजकीय पार्श्वभूमीसोबतच शिक्षण क्षेत्राशी त्यांचा असलेला प्रदीर्घ संबंध हीदेखील त्यांच्या संभाव्य उमेदवारीची महत्त्वाची बाजू मानली जात आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील त्यांची एन्ट्री ही केवळ राजकीय नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
उच्चशिक्षित पार्श्वभूमी जमेची बाजू
अदिती ऋषिकेश पोहरे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी विशेष लक्षवेधी आहे. त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. स्ट्रक्चरल डिझाईन हे पदव्युत्तर शिक्षण विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले आहे. याशिवाय इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. मानसशास्त्र हे शिक्षणही विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले आहे. त्यापूर्वी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय, बडनेरा येथून त्यांनी बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. फोर्ट कॉन्व्हेंट, मुंबई आणि होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल, अमरावती येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले आहे.
अध्यापनासोबत संशोधनाचा अनुभव
अदिती पोहरे यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या उमेदवारीची आणखी एक जमेची बाजू मानली जात आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, अकोला येथे त्या २०१० पासून पदव्युत्तर स्तरावर भूकंप अभियांत्रिकी विषयाच्या विशेष प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.एम.ई. स्तरावरील विविध शोधप्रबंध तसेच संशोधन प्रकल्पांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
सामाजिक क्षेत्रातही सक्रिय शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही अदिती पोहरे यांचा सहभाग आहे. देशोन्नतीमध्ये त्या संचालक म्हणून कार्यरत असून ‘महिलांचे व्यासपीठ मनस्विनी’च्या संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे शिक्षणासोबत सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचाही त्यांच्या संभाव्य उमेदवारीला फायदा होण्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळणार?
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात अनेक इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असताना अदिती पोहरे यांच्या उमेदवारीची चर्चा पुढे आल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उच्चशिक्षित पार्श्वभूमी, अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, शिक्षण क्षेत्राशी असलेला थेट संबंध आणि राजकीय वारसा या चारही बाबी त्यांच्या उमेदवारीला वेगळी धार देऊ शकतात.त्यामुळे अदिती पोहरे प्रत्यक्षात कोणत्या संघटनेच्या पाठबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरतात, शिक्षक मतदारांचा त्यांना किती प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्या उमेदवारीचा विद्यमान राजकीय समीकरणांवर किती परिणाम होतो, याकडे आता अमरावती विभागातील शिक्षकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.