पत्रकारांच्या कल्याणासाठी लढणाऱ्या अनिल म्हस्केंचा उद्या होणार पुण्यात गौरव! 
राज ठाकरेंच्या हस्ते होणार विशेष सन्मान!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारे प्रदेशाध्यक्ष तथा दैनिक 'पुण्यनगरी'चे अकोला आवृत्तीप्रमुख अनिल म्हस्के यांचा पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्टच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते विशेष गौरव केला जाणार आहे. सोबतच राज्यातील निवडक १२ संपादकांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून, समाजाचा आरसा आहे. पत्रकार घरावर तुळशीपत्र ठेऊन काम करतात. अत्यल्प मानधनावर काम करताना त्यांना अनंत अडचणी येतात. त्यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाहीत. अनेक कौटुंबिक समस्यांशी झगडत असतानादेखील केवळ जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका ठेऊन पत्रकारबांधव कार्य करत आहेत. या उपेक्षित पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणार्थ व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के झोकून देऊन काम करत आहेत. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे, ही मागणी त्यांनी शासन दरबारी रेटून धरली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अधिवेशनातही हा मुद्दा आमदारांमार्फत उपस्थित करण्यात आला. अनिल म्हस्के यांच्या कार्याची पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्टने दखल घेत त्यांचा सन्मान करण्याचे ठरविले आहे.पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषद व पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील पत्रकारांचा गौरव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ग.दि. माडगूळकर सभागृह, प्राधिकरण, निगडी (पुणे) येथे केला जाणार आहे.
१३ सत्कारमूर्ती
'पुण्यनगरी'चे अकोला आवृत्तीप्रमुख अनिल म्हस्के, संपादक पराग करंदीकर, कमलेश सुतार, राहुल कुलकर्णी, अद्वैत मेहता, अमित मोडक, संदीप महाजन, अविनाश खंदारे, अश्विनी सातव-डोके, नितीन पाटील, आशिष देशमुख, महेश तिवारी, गोविंद वाकडे.
तीन सत्रात होणार कार्यक्रम
पहिल्या सत्रात सकाळी साडेनऊ ते ११ या वेळेत 'मी आणि पत्रकार हक्काची लढाई' या विषयावर चर्चासत्र होणार आहे. दुसऱ्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी साडेबारा या वेळेत सत्कार समारंभ पार पडणार आहे. तसेच तिसऱ्या सत्रात दुपारी २ ते साडेतीन वाजेपर्यंत 'पत्रकार हल्लाविरोधी कायदा, वास्तव व गरज' या विषयावर चर्चासत्र होईल.