न्युजीवुड सिड्स कंपनीकडून अमोन्याच्या शेतकऱ्यांची फसवणूक! आधी प्लॉट लावायला लावला, मग म्हणे उपटून टाका! शेतकरी तहसीलदारांना भेटले!

 कंपनीवर कारवाईची मागणी! अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्याही पंचनाम्याची केली मागणी...नेमके प्रकरण काय? वाचा....

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली तालुक्यातील अमोन्याच्या शेतकऱ्यांनी काल तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली. न्यूजीवूड कंपनीने शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आणि २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान आदी बाबी अधिकाऱ्यांना अवगत करून दिले.. झालेली नुकसान भरपाई त्वरित द्यावी, त्यासाठी पंचनाम्याचे आदेश संबंधितांना द्यावेत अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.. सिद्धेश्वर इंगळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली..
सततच्या पावसामुळे अमोना येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उभे सोयाबीनचे पीक झोपून जळाले..यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली..त्यामुळे याचा पंचनामा करून तातडीने मदतीची तरतूद करावी अशी मागणी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी केली आहे. दुसरीकडे न्यूजीवूड कंपनीने अमोना येथील काही शेतकऱ्यांना कपाशीचा प्लॉट लावायला दिला होता. शेतकऱ्यांनी तशी लागवड देखील केली होती.. महिनाभर शेतकऱ्यांनी प्लॉट जपला, मात्र त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना फोन करून प्लॉट उपटायला सांगितला. यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे, शिवाय शेतकऱ्यांचे श्रमिक आणि आर्थिक नुकसानही झाले आहे. या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याशिवाय सन २०२३ –२४ चा रखडलेला पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशीही मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास जनआंदोलनाचा रेटा उभा करण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे..
या निवेदनावर सिद्धेश्वर इंगळे यांच्यासह, संतोष नारायण जायभाये, दीपक काशिनाथ वाघ, संजय काशिनाथ वाघ, सुमित दीपक वाघ, उद्धव नामदेव ताठे, सुभाष सोनाजी ताठे, सुभाष श्रीराम वाघ, विष्णू श्रीराम वाघ, विठोबा किसन भांदर्गे, गजानन जायभाये, राजू तुकाराम शिंदे, गजानन माणिकराव गावंडे, गजानन रामभाऊ पेहरे, भगवान आटोळे , श्रीधर जगदाळे , ज्ञानेश्वर शिंदे, दत्तात्रय रामराव इंगळे यांच्या सह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत...