चिखलीत सर्वपक्षीय एकजूट; कडकडीत बंद पाळून अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली...

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री स्व. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर चिखली शहरात आज सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळत स्व. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व व्यावसायिकांनी एकत्र येत शोकभावना व्यक्त केल्याने शहरात अभूतपूर्व एकजुटीचे चित्र दिसून आले.

स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर चिखली शहरासह संपूर्ण मतदारसंघात बंद पाळण्याचे संयुक्त आवाहन आमदार श्वेता महाले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत २९ जानेवारी रोजी शहरातील सर्वच व्यापारी व व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात आली. खामगाव चौफुली, बसस्थानक परिसर, डी.पी. रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, चिंच परिसर, बाबुलॉज चौक आदी प्रमुख ठिकाणांवरील बाजारपेठा पूर्णतः बंद होत्या.
दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीनेही खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार बंद ठेवत शोकभावनेत सहभाग नोंदवला. बंदबाबत आधीच कल्पना असल्याने शहरात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प राहिल्याने नेहमी गजबजलेली चिखलीची बाजारपेठ निर्मनुष्य झाली होती. या बंदला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सर्वपक्षीयांकडून सामूहिक श्रद्धांजली
आमदार श्वेता महाले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एकत्र जमले. यावेळी सर्वांनी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक श्रद्धांजली वाहिली.
“राज्याने एक कणखर, निर्भीड आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. चिखलीतील हा कडकडीत बंद केवळ शोक व्यक्त करण्यापुरता मर्यादित न राहता, स्व. अजित पवार यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करणारा सर्वपक्षीय संदेश ठरला.