अजय उमाळकर यांचे निधन; दातृत्वशील व्यक्तिमत्त्व हरपले
! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे विश्वासू सहकारी; सामाजिक कार्यासह निवडणूक नियोजनातही होते आघाडीवर

 
 मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मदतीसाठी सदैव पुढे असणारे, दानधर्म आणि सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अजय उमाळकर यांचे मुंबई येथील कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, एक सोज्वळ, धर्मनिष्ठ आणि दातृत्वशील व्यक्तिमत्त्व समाजाने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.अजय उमाळकर हे स्व. अरविंद उमाळकर वृद्धाश्रमाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र अर्बनचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेकांना विविध प्रकारे मदतीचा हात दिला. गरजूंच्या मदतीसाठी त्यांचा हात सदैव पुढे असायचा. त्यामुळे ‘अजुभाऊ’ म्हणून ते सर्वपरिचित होते.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणूनही अजय उमाळकर यांची ओळख होती. आतापर्यंतच्या विविध निवडणुकांमध्ये त्यांनी प्रतापराव जाधव यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. निवडणूक व्यवस्थापन आणि नियोजनाचे उत्कृष्ट कौशल्य त्यांच्याकडे होते. संघटनात्मक कामात बारकाईने नियोजन करण्याची त्यांची हातोटी अनेकदा उपयोगी ठरली.
अजयभाऊ हे सच्चे रामभक्त, धर्मनिष्ठ आणि मनमिळावू स्वभावाचे होते. दानधर्म, सामाजिक बांधिलकी आणि गरजूंच्या मदतीची त्यांची वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ‘अजुभाऊंची उणीव कधीही भरून निघणार नाही,’ अशा भावना व्यक्त करत अनेकांनी त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन केले आहे.

आज सायंकाळी अंत्यविधी

अजयभाऊ उमाळकर यांच्या पार्थिवावर आज, 20 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या राहत्या घरापासून, परिवार कलेक्शनजवळून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर जानेफळ रोडवरील स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहे.