साेयाबीननंतर आता मका पिकावर अळ्यांचे आक्रमण ; डोमरूळच्या शेतकऱ्याने मका पिकावर फिरवले रोटाव्हेटर; 
कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी!  

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतात जीव लावून उगवलेलं मका पीक डोळ्यांसमोर अळीच्या तडाख्याने सडतंय. शेतकऱ्याच्या नशिबी मात्र हातात रोटाव्हेटरच उरतो! डोमरूळ येथील शेतकरी सतिष भिमराव धंदर यांनी अळीच्या गंभीर प्रादुर्भावामुळे २० जुलै राेजी आपल्या गट क्र. ४३ मधील मका पिकावर अक्षरशः रोटाव्हेटर फिरवलं. महिन्यांच्या मेहनतीवर एका दिवसात पाणी फिरल्याची ही वेदनादायी कहाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या काळजात टोचणारी आहे.साेयाबीननंतर आता मका पिकही धाेक्यात आल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 

मागील वर्षी पावसाने साथ दिली. विहिरी, तलाव भरले. शेतकऱ्यांनी आशेवर पीक घेतलं. खरिपात मका वाऱ्यासारखा बहरला. पण परतीच्या पावसानं जोरदार झटका दिला. तरीही रब्बी हंगामात मका पीक जगवण्याची जिद्द शेतकऱ्यांनी दाखवली. पाण्याचा भरवसा होता. पण नशिबात अळीचं संकट लिहिलं होतं. डोमरूळसह धामणगाव धाड परिसरात अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, बदलत्या हवामानामुळे हा प्रसार अधिक भयावह होत आहे. शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत आहेत. पण काही उपयोग होत नाही. अळी झटकून टाकता येत नाही, म्हणून शेवटी रोटाव्हेटर चालवण्याशिवाय पर्याय राहत नाही. सतिष धंदर यांचं नुकसान लाखोंच्या घरात गेले आहे. धामणगावसह परिसरातील मका पीक वाचवण्यासाठी त्वरीत यंत्रणा राबवावी, अळीचा प्रभाव नियंत्रित करण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.