अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांची बदली रत्नागिरीला; बुलढाण्यातील दमदार कार्यकाळास अलविदा! 

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण करणारे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत कठोर भूमिका घेणारे अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांची कार्यकाळ संपल्याने रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार संध्याकाळी वीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले असून, त्यात महामुनी यांचाही समावेश आहे.

बाबूराव महामुनी हे नोव्हेंबर २०२२ पासून बुलढाणा जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्याआधी २०१९ मध्ये त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणूनही बुलढाण्यात सेवा बजावली होती. सुमारे पावणे तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींवर अंकुश ठेवत जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्थेची धुरा प्रभावीपणे सांभाळली.
त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागाने अनेक महत्त्वाच्या कारवायांना यश मिळवून दिले. गुन्हे तपासात पारदर्शकता, जनतेशी संवाद आणि पोलीस यंत्रणेचे कार्य अधिक लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या कामकाजाचा ठसा बुलढाण्यात कायम राहील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले महामुनी यांची रत्नागिरी येथे बदली झाल्याने त्यांना कुटुंबीयांसोबत अधिक वेळ देता येणार असून, ही बदली त्यांच्या दृष्टीने सुखद ठरणार आहे. जिल्ह्याबाहेर जाण्याची वेळ आली असली, तरी बुलढाण्यातील पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये त्यांनी निर्माण केलेला विश्वास दीर्घकाळ टिकून राहील.