चिखलीच्या राऊतवाडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; २५ जणांना चावा, नागरिक भयभीत – प्रशासनाची उदासीनता! कुत्रा मोकाटच....
Jun 4, 2025, 09:07 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातील राऊतवाडी परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल जवळपास २० ते २५ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी वारंवार नगरपरिषद चिखली प्रशासनाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी तक्रार स्थानिकांची आहे. "आणखी किती लोक जखमी व्हावेत म्हणजे प्रशासन जागं होईल?" असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. दोन दिवसांपासून या कुत्र्याची परिसरात दहशत आहे..
या घटनेत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही जखमी झाले असून, त्यांना तत्काळ उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, चिखलीतील उपजिल्हा रुग्णालयात सध्या रेबीज प्रतिबंधक औषधांची सुविधा उपलब्ध नसल्याची खंत देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, तसेच चिखली उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक औषधसामग्रीची तातडीने उपलब्धता करावी, अशी कळकळीची मागणी जनसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
राऊतवाडी परिसरात अजूनही पिसाळलेला कुत्रा मोकाट फिरत असल्याची माहिती मिळत असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित बंदोबस्त करण्याची गरज आहे.