शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय!
९० हजार ३८३ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ७४.४५काेटींची मदत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश : २५ आणि २६ जूनला झाली हाेती अतिवृष्टी 

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात २५ आणि २६ जून रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत ९० हजार ३८३ शेतकऱ्यांच्या ८७ हजार ३९० हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले होते. यावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून रु. ७४ कोटी ४५ लाखांची आर्थिक मदत मंजूर करून घेतली आहे.
या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शेतीची प्रचंड हानी झाली होती. प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांना धीर दिला व तात्काळ मदतीचं आश्वासन दिले हाेते. त्यांच्यासोबत माजी आमदार संजय रायमुलकर देखील उपस्थित होते.
त्यानंतर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष फोटो दाखवून मदतीची मागणी केली. शासनाने या मागणीची दखल घेत ६ ऑगस्ट रोजी परिपत्रक जारी करत ७४.४५ कोटींच्या मदतीला मंजुरी दिली.
मेहकर विधानसभा मतदार संघातील ६६ हजार शेतकरी मदतीस पात्र 
या अतिवृष्टीत मेहकर विधानसभा मतदार संघात ११२ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली होती. यामध्ये एकूण ६५ हजार ६०१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ६६ हजार शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. जमिनी खरडून जाणे, फळबागांचे नुकसान, गाळ साचल्यामुळे पीक नष्ट होणे अशा स्वरूपाचे नुकसान झालेल्या सुमारे सहा हजार शेतकऱ्यांचाही या यादीत समावेश आहे. मेहकर मतदारसंघातील शेतकऱ्यांना यामध्ये ६६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. या तातडीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांचे आभार मानत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी “शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तत्काळ मदत जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.