बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी! डाक कार्यालयाने "या" पदासाठी मागवलेत अर्ज! पात्रता फक्त दहावी पास हवा....
Jun 7, 2024, 14:03 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्ता यांची नेमणूक करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
थेट अभिकर्तासाठी अर्जाचा नमुना बुलडाणा प्रधान डाक घर किंवा डाक अधीक्षक बुलडाणा यांच्या लार्यालयात उपलब्ध आहे. एजंट भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असावे, शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी. बेरोजगारीत किंवा स्वयंम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवानिवृत्त शिक्षक व इतर अर्ज करू शकतील. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबत ज्ञानाच्या आधारावर केली जाणार आहे. परवाना परीक्षा नियुक्तीनंतर ३ वर्षांच्या आत पास करणे अनिवार्य राहील. निवड झालेल्या उमेदवारास ठरविलेले कमिशन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधीक्षक कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज आणि दहावी किंवा बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र, यासह सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्ताऐवजासोबत २८ जून रोजी ११ वाजता उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.
पाच हजार रुपये अनामत
निवड झालेल्या उमेदवारास ५ हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. सदर रक्कम राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अथवा कृषी विकास पत्राच्या स्वरुपात राहणार आहे. प्रशिक्षण पूर्ततेनंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. हा परवाना आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायमच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केल्या जाणार आहे.