सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करावे; जिल्हाधिकारी कार्यालयात सिंदखेडराजा विकास आराखडा बैठक

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सिंदखेडराजाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता सर्वंकष विकास आराखड्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. याठिकाणी विविध ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूंचे संवर्धन करावे लागणार आहे.  त्यासोबतच  पर्यटनाच्या दृष्टीने सोयी  सुविधांची निर्मिती करावी लागणार आहे. त्यामुळे सिंदखेड राजा विकास आराखडा बनविताना येथील सर्व ऐतिहासिक वारशाचे जतन होईल त्या दृष्टीने कामांचा समावेश करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज,२९ एप्रिलला  दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज  सिंदखेडराजा विकास आराखडा बैठक पार पडली. यावेळी कामांचा  आढावा घेताना पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. बैठकीला सिंदखेडराजाचे नगराध्यक्ष सतिष तायडे, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक श्रीमती वहाने यांच्यासह  केंद्रीय पुरातत्व विभाग, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सिंदखेडराजा येथे १०० बेडचे रूग्णालय करण्यासाठी जागा शोधावी. जागा मिळाल्यास तातडीने प्रस्ताव सादर करावा. केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाच्या वास्तूंची कामे करण्यासाठी एकच आर्कीटेक्ट असला पाहिजे .पुरातत्व विभागाचा प्रस्ताव व यंत्रणांच्या कामांचा प्रस्ताव स्वतंत्र तयार करण्यात यावा. संग्रहालयामध्ये त्याकाळातील पोषाख, शस्त्रास्त्र यांच्यासाठी दालन करावे. माहितीच्या दालनात परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती असावी. संग्रहालय हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असावे असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले .  कामाच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड करू नका अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.  या बैठकीत  राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग, क्रीडा विभाग, एमटीडीसी, नगरपालिका यांनी कामांचे सादरीकरण केले