महापुरुषांच्या सन्मानार्थ उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची बुलडाणा तालुक्यात सन्मान यात्रा! १० दिवस महापुरुषांच्या विचारांचा जागर;उद्या शिरपूर येथून होणार यात्रेला प्रारंभ, 

माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे राहणार उपस्थित! तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहानेंची अनोखी संकल्पना..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राष्ट्राच्या उभारणीत महापुरुषांचे मोठे योगदान आहे. अनेक वीरांच्या बलिदानातून हे राष्ट्र उभे राहिले आहे.   कुणी गनिमी काव्याने, कुणी अहिंसेचे, कुणी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने तर कुणी समाजसुधारणेच्या माध्यमातून भारतीय समाजाच्या कल्याणासाठी काम केले. या सर्व महापुरुषांचा आदर,सन्मान करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.  मात्र अलीकडच्या काळात काही नेत्यांकडून महापुरुषांबद्दल अपशब्द बोलण्याचा ट्रेंड सुरू झालाय. त्यामुळे महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या नेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशा नेत्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्यात यावे यासाठी कायदा करण्यात यावा या मागणीची जनजागृती करण्यासाठी तसेच समाजासाठी आदर्श असणाऱ्या महापुरुषांबद्दल आदर निर्माण व्हावा, महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा  यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून उद्या,१६ डिसेंबरपासून महापुरुषांच्या सन्मानार्थ सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बुलडाणा तालुक्यातील सर्वच गावांत ही यात्रा जाणार आहे. उद्या १६ , डिसेंबरला सकाळी ९ वाजता शिरपूर येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 १६ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत ही यात्रा बुलडाणा तालुक्यातील सर्वच गावांत जाणार आहे. गावागावांत विविध वक्त्यांकडून महापुरुषांच्या विचारांचा जागर देखील करण्यात येणार असल्याचे दत्तात्रय लहाने यांनी सांगितले. येणाऱ्या पिढीला महापुरुषांच्या कार्याबद्दल माहिती व्हावी, महापुरुष ,दिवंगत नेते, महिलांविषयी अपमानास्पद बोलणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. घटनात्मक पदांवर असणाऱ्या व्यक्तीने महापुरुषांबद्दल महिलांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्यास त्यांना पदावरून कमी करण्यात यावे या मागण्यांची जनजागृती देखील या सन्मान यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे श्री. लहाने यांनी सांगितले. सन्मान महापुरुषांचा, सन्मान शिवछत्रपतींचा, सन्मान संविधानाचा, सन्मान ज्येष्ठांचा, सन्मान महिलांचा हे ब्रीद घेऊन ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे.

उद्या शिरपूर येथून यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर यात्रा अंत्री तेली, साखळी, सव, खुपगाव,रुईखेड, खेर्डी, डोंगरखंडाळा, वरवंड व भादोला गावात जाणार आहे.१७ डिसेंबरला सागवन येथून यात्रेला प्रारंभ होईल. महापुरुषांचा सन्मान करण्यासाठी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बुलडाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.