किसान ड्रोन शेतकऱ्यांसाठी उपयोगी: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन! राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त अभिता कंपनीच्या वतीने किसान ड्रोनचे लॉंचिंग 

 
सिंदखेड राजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  किसान ड्रोनद्वारे १० ते २० लीटर कीटकनाशके फवारता येतात. एकावेळी २ ते ५ एकर शेतीत केवळ १५ ते २० मिनिटात फवारणी करता येते. किसान ड्रोन शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. 

                

अभिता लँड सोल्युशन आणि अभिता यूएव्ही इन्फ्राटेकच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त १२ जानेवारी रोजी किसान ड्रोनचे लॉंचिंग करण्यात आले. मातोश्री मंगल कार्यालयात दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडतेशनच्यावतीने आयोजित रोजगार मेळाव्यादरम्यान हे लॉंचिंग झाले. याप्रसंगी दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी अंबादास दानवे म्हणाले, आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. यांत्रिक शेती काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी शेतीत नवनवे बदल  केले पाहिजेत. अभिता कंपनीने उत्पादित केलेल्या किसान ड्रोन मुळे कीटकनाशक फवारणी सोपी आणि सोयीची झाली आहे. पारंपरिक पद्धतीने होणारे नुकसान आता टाळता येईल. भविष्यात किसान ड्रोनचे चांगले परिणाम दिसतील. 
अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके, दिशा बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांनी अंबादास दानवे यांचा सत्कार केला. यावेळी कंपनीचे प्रकल्प संचालक विशाल बुरसे उपस्थित होते.

 

दानवेंच्या हस्ते ड्रोनचे प्रात्यक्षिक

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते अभिता कंपनीने उत्पादित केलेल्या किसान ड्रोनचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यांच्या हस्ते लॉनवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. कमी वेळेत अत्यंत सुरक्षितपणे फवारणी केली जाते. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त किसान ड्रोन बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.