चहा करण्यासाठी पेटवला गॅस, सिलेंडरचा झाला स्फोट! भीषण आगीत लाखोंचे नुकसान; देऊळगावराजा तालुक्यातील आज सकाळची घटना 

 
मलकापूर पांग्रा (अमोल साळवे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)- चहा करण्यासाठी गॅस पेटवल्यानंतर गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यावेळी लागलेल्या आगीत घरातील लाखो रुपयांचे संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले. देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड नागरे येथे आज, ३ मे रोजी सकाळी ७ वाजता ही भीषण दुर्घटना घडली.

 आज सकाळी ७ वाजता सावखेड नागरे येथील परसराम भगाजी नागरे  हे शाळेवर नोकरीसाठी जात असतांना त्यांनी पत्नीला चहा ठेवायला सांगितला. मात्र गॅस पेटवल्यानंतर अचानक रेग्युलेटरने पेट घेतल्याने त्यांनी बाहेर धाव घेतली. गॅस सिलेंडर तीस ते पस्तीस फूट हवेत उंच उडाल्यानंतर खाली आदळले व त्याचा भीषण स्फोट झाला.

यावेळी लागलेल्या आगीत घरातील टिव्ही, फ्रिज , कुलर, पंखा, संसारउपयोगी साहित्य, धान्य , कपडे असे जवळपास ३ ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परसराम नागरे यांच्या मुलाची महिन्याभरापूर्वी सीआरपीएफ मध्ये निवड झाली होती. मात्र सेवेत रुजू होण्याआधीच त्याची शैक्षणिक कागदपत्रे सुद्धा या आगीत जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वृत्त लीहिस्तोवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती.